मालेगावात ‘द कश्मीर फाइल्स’ वरुन चित्रपटगृहात श्रेयवादाचा ‘शो’ | पुढारी

मालेगावात ‘द कश्मीर फाइल्स’ वरुन चित्रपटगृहात श्रेयवादाचा ‘शो’

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अखेर बुधवारी मालेगावात ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. सकाळचा पहिला शो युवा सेनेने आरक्षित केला होता, तर त्यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिनेमा पाहिला. घोषणाबाजी करित आपल्या आंदोलनात्मक पवित्र्यामुळेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा दोन्ही गटांनी केला.

बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमावरून क्रिया-प्रतिक्रियांचे गुर्‍हाळ सुरू आहे. या चित्रपटाच्या टीमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेत सादरीकरणाचे कौतुक केले अन् हा सिनेमा इतर सात राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ही करमुक्त करावा, या मागणीने उचल खाल्ली. परंतु, देश अन् राज्यपातळीवर असा राजकीय सामना रंगला असताना मालेगावात हा सिनेमा प्रदर्शित केव्हा होणार, याकडे सर्वसामान्य प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. हा विषय भाजप आणि शिवसेनेने अजेंड्यावर घेतला. भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी छावणी पोलिसांची भेट घेत बुधवारी (दि.16) चित्रपट प्रदर्शित न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर थिएटर आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली होऊन बुधवारी सकाळी 9 आणि साडेदहाच्या शो ला हिरवा कंदील मिळाला आणि श्रेयवादाचा ड्रामा सुरू झाला.

पहिल्या शोचे तिकीट युवा सेनेने आरक्षित केली होती. तो संपल्यानंतर युवा सेनेने सर्वप्रथम आपणच थिएटर व्यवस्थापनाकडे सिनेमासाठी मागणी नोंदविल्याचा दावा केला. तर, भाजपच्या दोन्ही गटांनी दुसरा शो पाहिल्यानंतर स्वतंत्र अभिप्राय नोंदवला. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांसह पदाधिकार्‍यांनी हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी जोरदार मागणी केली. सरचिटणीस देवा पाटील यांनी काँग्रेसने इतके वर्षे दाबलेले काश्मिरी सत्य अखेर बाहेर आल्याचे सांगितले.

मालेगावात सोयीस्कर संवेदनशीलता जपली जाते. मोर्चे काढून हिंसक वळण लावले जाते, तेव्हा शहर संवेदनशील नसते. आणि एका चित्रपटाच्या प्रदर्शनाप्रसंगी लगेच ही संवेदनशीलता कशी उभी ठाकते. हा दुटप्पीपणा भाजपने हाणून पाडला.
– सुनील गायकवाड, गटनेते, भाजप, मालेगाव

हेही वाचा :

Back to top button