कर्नाटक : प्रेमविवाहांमधून उद्भवणार्‍या समस्यांचे महिला आयोगापुढे आव्हान ; महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिला नायडू | पुढारी

कर्नाटक : प्रेमविवाहांमधून उद्भवणार्‍या समस्यांचे महिला आयोगापुढे आव्हान ; महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिला नायडू

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
शाळा, महाविद्यालयातील प्रेमप्रकरणामुळे होणार्‍या विवाहांमुळे उद्भवणारे अनेक प्रश्‍न महिला आयोगासमोर मोठे आव्हान बनले आहे, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती राज्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रमिला नायडू यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महिलावरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, स्वयंसेवी संस्थांची आढावा बैठक घेतली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलिस उपायुक्‍त स्नेहा पी. व्ही. उपस्थित होते.

नायडू म्हणाल्या की, सध्या शाळा, विद्यालयामध्ये प्रेमप्रकरणामुळे विवाह वाढत आहेत. यामध्ये अनेक वेळा मुली अल्पवयीन असल्याचेही आढळून येत आहे. कुटुंबाचे सहकार्य नसल्यामुळे हे विवाह टिकणे अवघड बनत असल्यामुळे मुलींना त्यांचे पती सोडून जाताना दिसत आहेत.अशा प्रकरच्या अधिकतर तक्रारी महिला आयोगाकडे दाखल होत आहेत. मुलींनी आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी स्वत: स्ववलंबी होऊनच अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत, यासाठी महिला आयोगामार्फत शाळा, महाविद्यालयामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमुळेही महिलांचे प्रश्‍न गंभीत बनत आहेत.

महिलांचे मानुसक, शारीरिक छळाच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे. 5 टक्के बोगस तक्रारीही दाखल होत आहेत. त्यामुळे पुरुष मंडळींना त्रास होत आहेत. अशा प्रकरणाच्या गुन्ह्यामध्ये तपासणी करुनच गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. महिलासाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थाना पोलिसाकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

हिजाबप्रकरणी मुलींना भेटणार

हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याचे पालन सवार्ंनी करावे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाही मार्ग आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात यावे. मुलींनी शिक्षण सोडू नये. यासाठी हिजाबसाठी आंदोलन करणार्‍या मुलींची भेट घेऊ, असे नायडू म्हणाल्या. बेळगाव येथील एका महिला पुनर्वसन केंद्रामध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार असून, याबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचलत का ?

Back to top button