गोवा : महाराष्ट्रातील बेपत्ता पीडिता दक्षिणेत सापडली ; गुंगीचे इंजेक्शन दिल्याचा पीडितेचा दावा | पुढारी

गोवा : महाराष्ट्रातील बेपत्ता पीडिता दक्षिणेत सापडली ; गुंगीचे इंजेक्शन दिल्याचा पीडितेचा दावा

मडगाव  :  पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्या प्रकरणाशी संबंधित पीडिता गेल्या दोन दिवसांपासून गायब होती. ती पीडिता मंगळवारी मध्यरात्री संशयास्पदरीत्या दक्षिण गोव्याच्या कोलवा किनारपट्टी भागात सापडली आहे.
आपल्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन आपल्याकडून कसल्यातरी कागदपत्रावर स्वाक्षर्‍या घेण्यात आलेल्या आहेत, असा दावा त्या पीडितेने केला आहे. सध्या ती कोलवा पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला नेण्यासाठी तिच्या आई-वडिलांसह पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांचे पथक गोव्याकडे रवाना झाले आहे.

सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री एक युवती संशयास्पदरीत्या कोलवाच्या गंधावली भागात फिरत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तिला पोलिस स्थानकात आणून तिची चौकशी केली. यामध्ये ही युवती बलात्कार प्रकरणातील पीडिता असल्याचे पोलिसांना
समजले.

पुण्यातून गायब झालेल्या या पीडितेने महाराष्ट्रातील एका समाजसेविकेशी मध्यरात्री संपर्क साधला. आपण गोव्यात असून, आपल्याला मदतीची आवश्यकता आहे, असे सांगितले होते. समाजसेविकेने दिलेल्या सूचनेप्रमाणे, तिने एका घरात मदत मागितली होती. समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, पुण्यासाठी निघालेली ही पीडिता अचानक गोव्यात पोहोचली आहे. तिने समाजसेविकेशी बोलताना प्रवासात तिला इंजेक्शन दिले होते. तिच्याकडून कोणत्या तरी कागदपत्रांवर स्वाक्षरीही घेतली आहे. आपण गोव्यात कसे पोहोचलो याविषयी तिला काहीच आठवत नाही, असे तिने सांगितले आहे. याबाबत शिवाजी नगर पुणे पोलिस स्थानकाला माहिती दिली आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस स्थानकाचे पथक तिला नेण्यासाठी गोव्याकडे रवाना झाले आहे.

चौकशीला असहकार्य

कोलवाचे पोलिस निरीक्षक मेलसन कुलासो यांनी दैनिक ‘पुढारी’ला सांगितले की, महाराष्ट्रात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंद आहे. त्या तक्रारीच्या आधारावर तिला पोलिस स्थानकात आणून तिची चौकशी केली आहे. चौकशीला ती सहकार्य करीत नाही. तिच्या वडिलांशी संपर्क साधला असून, ते तिला घेऊन जाण्यासाठी गोव्याकडे यायला निघाले आहेत. ही पीडिता गोव्याच्या कोलवा भागात सापडल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने प्रसारित केले होते.

Back to top button