

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : वळती (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्यांचा वावर आणखी वाढला आहे. गुरुवारी (दि. १७) सकाळी येथील लोंढे मळ्यात पंढरीनाथ नामदेव लोंढे यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यामुळे लोंढे मळा परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाने लोंढे मळ्यात पिंजरा लावून बिबट्याच्या मादीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
वळती गावानजीक लोंढे मळा आहे. तेथे अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. सध्या या परिसरात ऊस तोडणीची कामे जोरात सुरू आहे. गुरुवारी (दि. १७) पंढरीनाथ नामदेव लोंढे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु झाल्यावर सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास उसतोड कामगारांना सुरुवातीला बिबट्याचा एक बछडा आढळून आला.
त्यानंतर आठ वाजता आणखी दोन बछडे आढळून आले. परिणामी ऊस तोडणीचे काम थांबविण्यात आले. बुधवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऊसतोड कामगार महिलांना याच शेतात बिबट्या दिसला होता. त्यानंतर आज गुरुवारी (दि. १७) सकाळी तीन बछडे आढळून आल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
येथील देवराम शंकर लोंढे यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यावर १५ दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर येथून नजीकच दिनेश भालेराव यांना बिबट्याचे दर्शन जवळून झाले होते. या परिसरात एक-दोन नव्हे अनेक बिबट्यांचा वावर आहे.
या आढळून आलेल्या बछड्यांना अवसरी घाटातील वनसावित्री उद्यानात उपचारासाठी नेण्यात आले आहे. वनविभागाने लोंढे मळा परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक तसेच शेतकऱ्यांनी केली आहे.