उंब्रज (जि. सातारा) : पुढारी वृत्तसेवा
मस्करवाडी तालुका कराड येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज ( दि. १७ ) सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनरक्षक ए.एम.जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय ५५, रा. मस्करवाडी, तालुका कराड) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सूर्यवंशी हे सकाळी नऊ वाजण्याच्या माऊली कडी नावाच्या शिवारात जनावरांसाठी वैरण आणण्यास गेले होते. कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बिबट्या होता. त्याने अचानक सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला.
बिबट्याने सूर्यवंशी यांच्या हातावर, मानेवर, तोंडावर व पोटावर पंजा मारून जखमी केले आहे. सूर्यवंशी यांनी बिबट्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. या हल्ल्यामुळे रामचंद्र सूर्यवंशी हे काही वेळ चक्कर येऊन पडले होते. त्यांना उपचारासाठी सातारा येथे पाठविले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे चोरे येथील वनरक्षक ए.एम.जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली.
या घटनेने डोंगर कपारीवर वसलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळा, कॉलेज साठी ये-जा करणारे विद्यार्थी, नोकरी व कामानिमित्त ये- जा करणारे नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचलं का ?
बिबट्याच्या वावर शेताबरोबरच मानवी वस्तीनजीक होऊ लागला आहे. बिबट्याच्या हल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याची तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा.
– दत्ताराम सूर्यवंशी, ग्रामस्थ