नाशिक : 12 ते 14 वयोगटासाठी मनपाला डोसची प्रतीक्षा | पुढारी

नाशिक : 12 ते 14 वयोगटासाठी मनपाला डोसची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणापाठोपाठ आता आज बुधवार (दि.16) पासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. परंतु, सध्या या वयोगटाचे लसीकरण करण्याकरता मनपा प्रशासनाकडे डोसच उपलब्ध नसल्याने शासनाकडून येणार्‍या डोसवरच हे लसीकरण अवलंबून राहणार आहे.

15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी 99 हजार 900 इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 58,837 (65 टक्के) इतक्या मुलांचा पहिला, तर 26,868 (30 टक्के) इतक्या मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाची टक्केवारी पाहता किशोरवयीन गटातील मुलांनी पहिल्या आणि दुसर्‍या डोसकडेदेखील पाठ फिरवली आहे. त्यात आता इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू झाल्याने जवळपास लसीकरणच थांबले आहे. शासन निर्णयानुसार 12 ते 14 वयोगटातील किती मुलांना डोस द्यायचे याबाबत अद्याप शासनाकडून मनपाला उद्दिष्ट आलेले नाही. शिवाय सध्या डोस उपलब्ध नाही. यामुळे शासनाकडून किती व कधी डोस उपलब्ध होणार यावरच 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण अवलंबून राहणार आहे. बुधवारी (दि.16) पुणे येथून नाशिक महापालिकेला कोव्हॅक्सिन लशीचे डोस प्राप्त होण्याची शक्यता आहे.

18 ते 44 वयोगटातील 8 लाख 39 हजार 400 पैकी 7 लाख 47 हजार 974 (89 टक्के) नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, 6 लाख 16 हजार 353 (73 टक्के) इतक्या नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. 45 ते त्यापुढील वयोगटासाठी 5 लाख 24 हजार 300 इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 5 लाख 51 हजार 185 (105 टक्के) नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. ही टक्केवारी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक असून, यात 34 हजार 767 (7 टक्के) इतक्या बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांचा समावेश आहे. संबंधित वयोगटातील 4 लाख 6 हजार 187 (77 टक्के) इतक्या नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

नागरिकांची दुसर्‍या डोसकडे पाठ…
18 ते 44 आणि 45 ते त्यापुढील वयोगटातील 13 लाख 63 हजार 700 पैकी 12 लाख 99 हजार 159 (95 टक्के) इतक्या नागरिकांनी पहिला, तर 10 लाख 22 हजार 540 (75 टक्के) इतक्या नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूणच नागरिकांकडून दुसर्‍या डोसकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याचबरोबर बूस्टर डोस घेण्याकडील कलही कमी
झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button