नाशिक : बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास गेलेल्या दोन भावांचा अपघातात मृत्यू | पुढारी

नाशिक : बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास गेलेल्या दोन भावांचा अपघातात मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा ; बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटपासाठी गेलेल्या भावांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात सोमवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास चाचडगाव शिवारातील गोळशी फाटा येथे घडला.

सोमनाथ वसंत भोये (32), जगन पोपट भोये (26) अशी या दोन्ही भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ट्रकचालक अनिल सुरेश निकम (रा. साक्री) हा भरधाव ट्रक (एमएच 18 एजे 5395) घेऊन जात होता. चाचडगाव शिवारातील गोळशी फाट्याजवळ या ट्रकने भोये बंधूंच्या दुचाकीला (एमएच 15 एचबी 1530) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात सोमनाथ भोये, जगन भोये या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

यामुळे दिंडोरी तालुक्यातील महाजे, गोळशी, ननाशी या परिसरामध्ये शोककळा पसरली. या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button