जिचे हाती क्रिकेटची बॅट!

जिचे हाती क्रिकेटची बॅट!
Published on
Updated on

ए भवाने, सकाळ सकाळी कुठे चाललीयेस ग उंडारायला? तीही हातात क्रिकेटची बॅट घेऊन? अग ए टवळे, वरणढवळे…
काय झालं आजी? का ओरडताय नातीला?

हातात झारा, उलथनं धरायचं सोडून बॅट धरतेय बया. बघा ना हो भाऊ, आताशा हा कसला नाद धरून बसलीये पोर?
नाद करायचा नाय असं सांगा तिला.

एवढी नाजूकसाजूक पोर आपली, तर सारखी उन्हातान्हात तडमडायला बघते हल्ली. घेतलं ते पाच पैशाचं फळकूट हाताशी, की निघाली.
फळकूट काय म्हणता आजी? क्रिकेटची बॅट आहे ती. आणि पाच पैशाचं विसरा. अहो, एकाहून एक महागड्या बॅटी शेकडो, हजारो रुपये टाकून आणतात लोक. म्हणून पुढे जीवापाड जपतातसुद्धा त्यांना.

लोकांचं सोडा. पोरीबाळींची तिथे काय गरज म्हणते मी? त्यांना कुठे जाऊन परजवायच्यात त्या बॅटी? बॅटने कढईतला पदार्थ परतणार की बॉलचा नेम धरून आंबे, पेरू पाडणार?
असं का म्हणता? सध्यातर महिला क्रिकेटचा वर्ल्ड कपसुद्धा चालू आहे की?
तेच म्हणणार होते. सध्या जरा जास्तच माजलंय का पोरीबाळींच्या क्रिकेटचं?

1 मार्चपासून. वर्ल्डकपमध्ये आपल्या पोरी झळकताहेत ना! पाकिस्तानला हरवलं, वेस्ट इंडीजला हरवलं, हे काय सोपं काम असणार आहे का?

मोठ्या शहरातल्या आणि बड्या घरच्या पोरींची कामं असणार ती! तो काही आपल्यासारख्यांचा घास नाही.
कोण म्हणतं असं?

म्हणायला कशाला पाहिजे? तेवढं कळत नाही का आम्हाला?

आजी, स्मृती मानधना सांगलीची आहे. राजेश्‍वरी गायकवाड विजापूरची, मुंबईच्या पूनम यादवचे वडील टॅक्सी चालवणारे! ही काय शहरी आणि श्रीमंत मुलींची उदाहरणं आहेत? तरी आज गाजताहेत ना सगळ्या क्रिकेटमध्ये?

ते काहीही असूदे भाऊ. माझ्या मते घरच्या पोरींनी घरकाम शिकणं बरं पडेल. नाहीतर नोकरी मिळेल असं शिक्षण तरी घ्यावं. चांगलं क्रिकेट खेळण्याबद्दलही तिला नोकरी मिळू शकते बरंका आजी. मुळात क्रिकेट हेच तिचं करिअरसुद्धा होऊ शकतं. कपाळ! एका चेंडूमागे अकरा जणांनी धावायचं, हे काय करिअर म्हणायचं? शेवटी किती वर्षं धावेल बाईमाणूस?
आजी तुम्ही लहानपणी लंगडी, खो-खो वगैरे खेळला असाल ना?
हो तर. वार्‍यासारखी पळणारी आणि झडप घालणारी होते मी; पण लग्‍न झालं, मुलं झाली, तसतसं सुटलं सगळं.
म्हणजे ते साधे, देशी खेळही थोडी वर्षंच खेळता आले ना?

आता तसं तर वयाने एकेक सुटणारच. तसंच क्रिकेटही मोजकी वर्षंच जमेल कदाचित; पण रीतसर क्रिकेटचं तंत्र शिकली, तर थोडी वर्षं खेळूनही खूप नाव करेल हो पोरगी. देश -परदेशही गाजवून सोडेल.

पण, ही एकेक नवी नाटकं हवीतच कशाला म्हणते मी. तुम्हाला वाटतं तेवढं नवं नाहीये बायांचं क्रिकेट. ऐंशी सालपासून खेळताहेत मुली. मिताली राजने धावांचा उच्चांक प्रस्थापित केलाय. स्मृती मानधना जगातली सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ठरलीये. अजून कुठलं नवं पीस खोचायचंय टोपीत?

असेल बाई. त्यांचं त्यांना लखलाभ. मला एवढं कळतं, 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी,' असं उगाच नाही म्हटलं जुन्या लोकांनी!
असेल; पण आपण नव्या लोकांनी ते बदलून घेऊया थोडंसं. म्हणूया, 'जिच्या हाती क्रिकेटची बॅट, तिचा जगात न्याराच थाट!'

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news