कैरो : गिझाच्या पिरॅमिडमधील छुपे चेंबर होणार उघड? | पुढारी

कैरो : गिझाच्या पिरॅमिडमधील छुपे चेंबर होणार उघड?

कैरो : जगातील आश्चर्यांच्या यादीत इजिप्तमधील भव्य पिरॅमिडस्चा समावेश होतो. हजारो वर्षांपूर्वी बनवण्यात आलेल्या या रचना आजही लोकांच्या कुतुहलाचा आणि संशोधनाचा विषय आहेत. गिझाच्या ‘ग्रेट पिरॅमिड’मध्ये आता एक नवे संशोधन केले जाणार आहे. कॉस्मिक रेजचा वापर करून एका नव्या अल्ट्रा-पॉवरफूल स्कॅनच्या सहाय्याने तेथील दोन छुप्या, रहस्यमय चेंबर्सचे रहस्य उलगडता येऊ शकेल असे संशोधकांना वाटते.

या दोन भूमिगत चेंबर्सपैकी सर्वात मोठे चेंबर ‘ग्रँड गॅलरी’च्या वर आहे. ही गॅलरी किंवा छोटा मार्ग फेरो खुफूच्या समजल्या जाणार्‍या चेंबरकडे जातो. ही गॅलरी 98 फूट लांबीची आणि 20 फूट उंचीची आहे. तिच्या अगदी वरच्या बाजूलाच हे मोठ्या आकाराचे छुपे चेंबर आहे. यापूर्वीच्या पिरॅमिडच्या स्कॅनिंगमधून त्याचा छडा लागला होता. याठिकाणी काय सापडेल याचा अंदाज संशोधकांना नाही. ते एकच एक विशाल दालन असू शकते किंवा त्यामध्ये अनेक छोट्या खोल्याही असू शकतात. या चेंबरचा वापर कशासाठी करण्यात आला हे आता समजू शकेल. महत्त्वाचे म्हणजे हे चेंबर खुफूच्या छुप्या भूमिगत चेंबरमध्ये उघडते का हे सुद्धा समजू शकेल.

पूर्वी झालेल्या स्कॅनिंगमधून आणखी एका छोट्या चेम्बरचा छडा लागला होता. ते पिरॅमिडच्या उत्तरेकडील बाजूच्या अगदी मागेच आहे. या चेंबरचे प्रयोजनही अद्याप समजलेले नाही. इसवी सन पूर्व 2551 ते इसवी सन पूर्व 2528 या काळात इजिप्तमध्ये राज्य केलेल्या फेरो खुफूच्या नावाचा हा पिरॅमिड आहे. प्राचीन इजिप्तमधील पिरॅमिडस्पैकी हा सर्वात मोठा पिरॅमिड आहे. साडेचार हजार वर्षांपूर्वीचा हा पिरॅमिड अजूनही त्या प्राचीन काळातील संस्कृतीची साक्ष देत उभा आहे.

 

Back to top button