नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीशी संबंधित रघुनाथ कुचिक आणि त्यांच्या सहकार्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला ठाकरे सरकार आणि त्यांची पोलिस यंत्रणा जबाबदार असेल, असा इशारा देत महिला आणि मुलींच्या इज्जतीचे वाभाडे काढण्यासाठीच तुम्हाला सत्ता हवी होती का, असा प्रश्न भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
येवला येथे एका भोंदूबाबाकडून एका कुटुंबावर झालेल्या अन्यायासंदर्भात चित्रा वाघ यांनी भेट दिली. त्यावेळी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या महिला अत्याचारांविषयी हळहळ व्यक्त करीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पुणे येथील अत्याचारपीडित मुलगी गायब झाल्याने त्यास भारतीय कामगार सेनेशी संबंधित रघुनाथ कुचिक आणि राष्ट्रवादीशी संबंधित एक व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप वाघ यांनी केला. घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणेकडे सर्व प्रकारचे पुरावे सुपूर्द करूनही दोघांना जामीन कसा मिळाला, असा प्रश्न करीत सरकारमधील लोक त्यांच्या पाठीशी असल्यानेच संबंधित दोघे बिनदिक्कतपणे बाहेर फिरत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
यावेळी वाघ यांनी अत्याचारपीडित मुलीला संबंधितांनी टाकलेल्या काही पोस्ट वाचून दाखविल्या. यातून त्यांनीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांच्यावर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मुलगी गायब झाल्याचे समजताच मी पुणे शहर पोलिस आयुक्त आणि गृहमंत्र्यांना फोन केला, मात्र त्यांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी नाशिकसह वडगाव शेरी, येवला, पुणे येथील काही घटना निदर्शनास आणून देत अशा घटना घडत असताना पोलिस यंत्रणा काय करते आहे, असा प्रश्न उपस्थित केला. येवला येथील घटनेत पोलिस निरीक्षक मथुरे हे योग्य प्रकारे तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.