इस्लामपूर: पाण्यासाठी महिलांचे ‘शोले’स्टाईल आंदोलन | पुढारी

इस्लामपूर: पाण्यासाठी महिलांचे ‘शोले’स्टाईल आंदोलन

इस्लामपूर पुढारी वृत्तसेवा : वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु हा प्रश्न मार्गी न लागल्याने सोमवारी उपनगरातील महिलांनी पालिकेवर पुन्हा मोर्चा काढला. यावेळी मुख्याधिकारी पालिकेत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी पालिकेच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शंखध्वनी केला . दुपारपर्यंत हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली टकलाईनगर व भागातील महिला व पुरुष यांनी सकाळी पाण्यासाठी मोर्चा काढून पालिकेत मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या दालनात धडक मारली. मात्र मुख्याधिकारी साबळे हे परगावी गेल्याने ते दालनात उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलकांनी तेथेच ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एका महिलेला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली.

विक्रम पाटील म्हणाले, गेले अनेक दिवस या भागातील नागरिकांनी मागणी करुनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. त्याच्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे प्रशासन इस्लामपुरातील सर्वच कामे करण्यात अपयशी ठरलेले आहे. प्रशासनाने बेजबाबदारपणाचे वागणे बंद करावे. नेहमीप्रमाणेच मुख्याधिकारी नगरपालिकेत थांबले नाहीत.

प्रभारी पाणीपुरवठा अधिकारी अविनाश जाधव व सतीश दंडवते यांनी आंदोलकांचे म्हणणे एकूण घेतले. मात्र जोपर्यंत अधिकारी येथे येऊन ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत तेथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. चार वाजेपर्यंत हे आंदोलक पालिका आवारात ठिय्या मारून होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

Back to top button