नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या लेखी परीक्षेला मंगळवार (दि. 15) पासून प्रारंभ होत आहे. पुढील 20 दिवस अर्थात 4 एप्रिलपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा सोमवारी (दि. 14) संपल्याने विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेच्या अभ्यासाकडे मोर्चा वळविला आहे.
नाशिक विभागातील 2 हजार 762 माध्यमिक शाळांतून 2 लाख 1 हजार 199 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. शाळा तिथे परीक्षा केंद्र या धर्तीवर 2 हजार 666 केंद्रांमध्ये परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र संचालकांची तसेच पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. 15) प्रथम भाषा विषयाचे पेपर दोन सत्रांत घेतले जाणार आहे. सकाळच्या सत्रात 10.30 ते 2 यावेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी याविषयांचे पेपर होणार आहेत. दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 6 या वेळेत जर्मन आणि फ्रेंच विषयांचे पेपर होणार आहेत. शनिवारी (दि.19) इंग्रजीचा पेपर घेतला जाणार आहे. दरम्यान, इयत्ता बारावीच्या पेपरफुटीच्या चर्चेमुळे शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी शिक्षण मंडळाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्हा निहाय विद्यार्थी व केंद्र संख्या
जिल्हा विद्यार्थी संख्या नियमित परीक्षा केंद्र शाळा तिथे परीक्षा केंद्र
नाशिक 93,708 203 1,077
जळगाव 58,510 138 761
धुळे 28,603 66 451
नंदुरबार 20,678 48 377
एकूण 2,01,199 455 2,666