World Consumer Day : ऑनलाईन फसवणूक आणि ग्राहक

World Consumer Day : ऑनलाईन फसवणूक आणि ग्राहक
Published on
Updated on

आज जागतिक ग्राहक दिन (World Consumer Day). त्यानिमित्त आर्थिक आणि ऑनलाईन खरेदी करताना होणार्‍या फसवणुकीबाबत ग्राहकांनी काय दक्षता घ्यावी, ऑनलाईन तक्रार, त्याचा पाठपुरावा याविषयी…

ई-शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अ‍ॅपमधून होणार्‍या खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठ्या प्रमाणात पैसे हडप केले जातात. बँकेतून फोन कॉल केल्याचे भासणिार्‍या भामट्यांवर अतिविश्‍वास ठेवणे ग्राहकांना भोवते. गुन्हेगारांकडून ई-मेल, अ‍ॅप, लिंक, बोगस कॉल सेंटर असे सापळे रचूे जातात.

बँकेमधून फोन आल्याचे भासवणार्‍या भामट्याकडे आपल्या खात्याचा बर्‍यापैकी तपशील असतो. फोन कॉल्ससाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेल्या सीमकार्डचा वापर केला जातो. सीमकार्ड ज्याच्या नावे आहे, त्याच्यापर्यंत पोलिस पोहोचतात. मात्र, गुन्ह्यात त्याचा काहीच सहभाग नसतो. ऑनलाईन फसवणूक करून आलेली रक्कम बँकेत वळती करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्‍तीस सोबत घेतले जाते. त्याच्या खात्यात रक्कम वळती करून त्यास कमिशनपोटी काही रक्कम दिली जाते. बँक खातेदारांपर्यंत पोलिस पोहोचतात. परंतु; सूत्रधार वेगळाच असतो. (World Consumer Day)

लॉटरी लागल्याचा येणारा ई-मेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम आदी मोहाच्या सापळ्यात शेकडो जण अडकतात. अशी रक्कम आपल्याला कुणी का देईल, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे ओटीपीपासून इतर सर्व माहिती दिली जाते आणि नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलवरून ई-व्यवहार करताना त्यातील खाचाखोचा ठाऊक नसतात. ई-साक्षरतेचा अभाव घातक ठरू शकतो. नेटच्या माध्यमातून मोबाईल अगर लॅपटॉपवरून होणारा ई-व्यवहार काही सेकंद, काही मिनिटांचा असतो. ऑनलाईन ठगांकडून ही रक्कम एटीएमवरून काढून घेण्याचे प्रकार घडतात.

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (छरींळेपरश्र उेर्पीीाशी कशश्रश्रिळपश) द्वारे ऑनलाईन तक्रार करता येते. अनेकदा ऑर्डर केलेली वस्तू मिळत नाही किंवा हव्या त्या रंगाचा किंवा तशाच फीचर्सचा अभाव असलेली वस्तू येते. सामानामध्ये काही समस्या असल्यास कंपनी ते रिटर्न घेत नाही. असे घडले आणि कंपनी ऐकत नसेल तर त्याबद्दल नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईनवर तक्रार करता येते.

कोणत्याही वेबसाईटवरून खरेदी करत असल्यास त्या वेबसाईटची परिपूर्ण सत्यता जाणून घेतली पाहिजे. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या नोंदणी क्रमांक 1800-11-4000 किंवा 14404 वर तक्रार करू शकता. सुट्टीचा दिवस वगळता सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत फोन करावा. यासोबतच ऑनलाईन वेबसाईट https://consumerhelpline.gov.in VgoM NCH APP, Consumer App, UMANG APP च्या माध्यमातूनही तक्रार करू शकता.

सुधारित 2019 च्या ग्राहक संरक्षण कायद्यातील नियमानुसार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि उत्पादकांनासुद्धा त्यांच्या वेबसाईटवर त्या वस्तूची निर्मिती कोणत्या देशात झाली, उत्पादकाचा, उत्पादनाचा भौगोलिक पत्ता, कार्यालयाचा पत्ता, व्यवसाय रजिस्टर्ड आहे की नाही, वस्तूची एक्स्पायरी तारीख, वॉरंटी गॅरंटीच्या अटी-शर्ती, वस्तू नापसंत असेल किंवा वस्तूमध्ये दोष आढळला तर किंवा खूप उशिरा मिळाली तर परत करण्याची आणि त्यानंतर रिफंडची पद्धत जाहीर करणे बंधनकारक आहे. उत्पादनाचे रेटिंग कशाच्या आधारे काढले, विदेशातील कंपन्यांना त्यांचे भारतातील तक्रार निवारण अधिकारी, त्यांचे फोन नंबर, ई-मेल याचा तपशील देणे बंधनकारक आहे.

ऑनलाईन खरेदी करणार्‍यांना ऑनलाईन न्याय (ई जस्टिस) मिळण्याची सोय या कायद्यात आहे. तक्रारीनंतर 48 तासांत ग्राहकाला तक्रार रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल. ज्याच्या आधारे ग्राहक पुढील कार्यवाहीचे ट्रॅकिंग करू शकेल. तक्रारीनंतर पुढील तीस दिवसांत तक्रार निवारण करणे बंधनकारक आहे. वरील कोणतीही बाब जर विरुद्ध पक्षाने केली नसेल तर ती सेवेत त्रुटी मानली जाईल. त्यासाठी ग्राहक आयोगाकडे दाद मागता येईल.

– जगन्नाथ जोशी
(लेखक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हा संघटन मंत्री आहेत.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news