कोल्हापूर : ‘उत्तर’चा भाजप उमेदवार चार दिवसांत होणार जाहीर | पुढारी

कोल्हापूर : ‘उत्तर’चा भाजप उमेदवार चार दिवसांत होणार जाहीर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी एका हॉटेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती दरम्यान काही इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन केले. प्रदेश कार्यालयाकडे याबाबतचा अहवाल पाठविण्?यात आला असून चार दिवसांत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ‘कोल्हापूर उत्तर’ ची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी शहरातील एका हॉटेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर, माणिक पाटील-चुयेकर, सचिन तोडकर, दौलत देसाई यांनी मुलाखत दिली. भाजपचे कोल्हापूर महानगरपालिका प्रभारी माजी खासदार धनंजय महाडिक, निवडणूक प्रमुख राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर आणि मकरंद देशपांडे यांनी या मुलाखती घेतल्या.

मुलाखतीनंतर सर्व इच्छुकांची संयुक्‍त बैठक घेण्यात आली. यावेळी पक्ष देईल तो उमेदवार स्वीकारून त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्णय इच्छुकांनी घेतल्याचे सांगण्यात आले. या मुलाखती संदर्भातील सविस्तर अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविण्यात आला आहे. प्रदेश कार्यालयाकडून हा अहवाल शिफारशीसह दिल्ली येथे कोअर कमिटीकडे पाठविला जाईल. त्यानंतर कोअर कमिटी उमेदवाराचे नाव जाहीर करेल. त्यामुळे चार दिवसांत उमेदवार जाहीर होण्?याची शक्यता आहे.

Back to top button