नाशिक : ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा 2027 च्या कुंभमेळ्यात लाभ : ना. कपिल पाटील | पुढारी

नाशिक : ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा 2027 च्या कुंभमेळ्यात लाभ : ना. कपिल पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नमामि गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा हा प्रकल्प उभारला जाणार असून, तो शंभर टक्के पूर्ण केला जाईल. उद्याच केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन निधीच्या उपलब्धतेबाबत चर्चा करणार आहे. 2027 च्या कुंभमेळ्यात देशभरातून येणार्‍या लाखो भाविकांना या प्रकल्पाचा लाभ होईल, अशी ग्वाही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

गोदाकाठावरील यशवंतराव महाराज पटांगण येथे आयोजित नमामि गोदा या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, नगरसेवक उद्धव निमसे, दिनकर पाटील, महेश हिरे, जगन पाटील, भक्तिचरणदास यांच्यासह साधू-महंत उपस्थित होते. ना. कपिल पाटील म्हणाले की, गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. गोदावरीला आपण माता संबोधतो. त्यामुळे पंतप्रधानांनी आपल्या मातेला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यांनी केलेल्या संकल्पात आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे.

देशातील नद्या आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अशात नद्या गटारात परिवर्तित होणे योग्य नाही. ही बाब जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी ‘नमामि गोदा’ हा प्रकल्प हाती घेतला. येत्या काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीचे पाणी गंगेसारखे होईल. हे पाणी हातात घेऊन ते प्यायल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा पवित्र प्रकल्पाचे भूमिपूजन माझ्या हस्ते व्हावे यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असेही त्यांनी म्हटले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिक शहराच्या विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीचे पावित्र्य जपता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी साधू-महंतांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

राज्यातील सर्वच नद्यांचा कायापालट करणार
नमामि गोदे या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतरही नद्यांचा कायापालट केला जाणार आहे. नद्यांप्रती आपली श्रद्धा असल्याने, त्या स्वच्छ करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. अशात आगामी काळात या प्रकल्पाच्या धर्तीवर इतरही नद्यांचे काम हाती घेतले जाईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिकचे पर्यटन वाढणार असून, त्याचा नाशिकच्या अर्थकारणातही मोठा लाभ होईल, असेही केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा :

Back to top button