सांगली: सोशल मीडियावरून गुन्हेगारीत वाढ | पुढारी

सांगली: सोशल मीडियावरून गुन्हेगारीत वाढ

सांगली पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरून होणार्‍या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये बनावट प्रोफाईल तयार करणे, बदनामीकारक मजकूर टाकणे, अश्लिल पोस्ट टाकणे, खंडणी, फोटो मॉर्फिंग, दोन जातींमध्ये तेढ आणि वर्चस्व निर्माण करणार्‍या पोस्ट अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या सर्वाधिक तक्रारी सायबर सेलकडे येत आहेत.

येथील सायबर शाखेत प्रत्येक महिन्यात सरासरी पन्नास तक्रारी येत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गामुळे मोबाईल आणि इंटरनेट वापराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे फेसबुकवरून होणार्‍या गुन्ह्यांच्या तक्रारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

सोशल मीडिया वापरणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. परिणामी सोशल मीडियाद्वारे होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या आठवड्यात येथील कॉलेज कॉर्नरजवळ व्हिडिओ पार्लरच्या बाहेर एका तरुणाचा खून करण्यात आला. त्यामधील मयताने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेट्सवरून संशयिताबरोबर वाद झाला. त्याची परिणिती खुनात झाली.

दोन दिवसांपूर्वी उमदी येथे सोशल मीडियावरून वाद होऊन झालेल्या दोन गटातील राड्यात दोघांचा मृत्यू झाला. त्याशिवाय एक जण गंभीर झाला. सोशल मीडियावर अश्लिल चाट करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार करणे, असे प्रकार वाढत आहेत.

सोशल मीडिया वापरताना घ्या दक्षता

सोशल मीडियावर संवेदनशीलबाबींवर पोस्ट/कमेंट करू नका, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. कोणत्याही संवेदनशील बाबींवर आपत्तीजनक पोस्ट/कमेंट करू नये. आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसर्‍याच्या संगणकावरून करू नका, अनोळखी संकेतस्थळांना भेटी देणे टाळा, फोन क्रेडिट/ डेबिट कार्ड व ई-बॅकिंगची माहिती अनोळखी लोकांना देऊ नका, गोपनीय माहिती, पासवर्ड, फोन नंबर देऊ नका.

पोलिसांची बदनामी करणार्‍यांना दणका

सोशल मीडियाच्या माध्यमातून काहींनी पोलिस आणि पोलिसांच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे संबंधिताने सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडे धाव घेत लोटांगण घातले. त्यामुळे तूर्त तरी कारवाई टळली आहे. मात्र, यातून आता पोलिस स्टेशनमध्ये हजेरी सुरू आहे.

Back to top button