

नवी दिल्ली : कोरोना महामारी संकट काळात या विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून भारतासह देशभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, याच 'वर्क फ्रॉम होम'संदर्भात न्यूझीलंडमध्ये नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या संशोधनातील निष्कर्षानुसार 'वर्क फ्रॉम होम' काळात पुरुषांचे दिवस आनंदात गेले. महिला कर्मचार्यांना मात्र नोकरीची जबाबदारी पार पाडतानाचा घर, कुटुंब आणि मुलांची अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागली.
न्यूझीलंडच्या इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या वतीने करण्यात आलेल्या या माहितीनुसार, संशोधनात सहभागी झालेल्या 60 टक्के लोकांनी घरातून काम करणे सकारात्मक ठरल्याचे सांगितले, तर 22 टक्के कर्मचारी असे होते की, त्यांना नोकरीबरोबरच घराचीही जबाबदारी सांभाळताना कसरत करावी लागली. कारण, कोरोनाकाळात शाळा बंद होत्या. त्यामुळे महिलांना कार्यालयीन कामाबरोबरच मुले आणि घरातील अतिरिक्त जबाबदारी पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागली. एएसबी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विटोरिया शॉर्ट यांनी सांगितले की, या संशोधनातून महिला आणि पुरुष यांच्यातील कामाचे अंतरही स्पष्ट होते. महिलांकडून घरकामाची अपेक्षा केली जाते. कुटुंबाचीही जबाबदारी पार पाडण्यात महिला कोठेच कमी पडल्या नाहीत. यामुळे कुटुंबव्यवस्था बळकट होण्यास मदत मिळाली.