इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
रेव्ह पार्ट्यांसह निरनिराळ्या कारणांनी सतत चर्चेत राहणार्या इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा हुक्का पार्टी व देहविक्रयाचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या या पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकून 55 पुरुष व 20 तरुणी अशा तब्बल 75 जणांना अटक केली आहे.
तालुक्यातील त्रिंगलवाडी हद्दीतील पारदेवी येथील माउंटन शॅडो रिसॉर्टमध्ये एका नामांकित कंपनीकडून या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास या पार्टीवर छापा टाकला. पार्टीतील अनेक जण हुक्का ओढत असल्याचे व अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी 55 पुरुष व 20 तरुणींना बेड्या ठोकल्या.
त्यांना इगतपुरी पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरण ीमुख्य आरोपी मनीष नयन झवेरिया (52, रा. विलेपार्ले, मुंबई), माउंटन शॅडो रिसॉर्टचा मालक महेंद्र डोसाभाई मोमाया शहा (रा. शरणपूर, नाशिक), रिसॉर्टचा व्यवस्थापक अमर मोरे (रा. श्रीवर्धन, जि. रायगड), पार्टीचा आयोजक आशिष छेडा (रा. दहीसर, मुंबई), व केतन गडा (रा. कांदिवली, मुंबई) यांच्यासह अन्य पुरुषांना अटक करण्यात आली. तर देहविक्रयासाठी महिला पुरविणार्या मुंबईच्या दोन महिलांनी त्यांच्यासमवेत 18 महिलांना देहविक्रयासाठी आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या महिलाही हुक्का पार्टीत सामील होऊन देहविक्री करीत असल्याचे आढळून आले. याशिवाय पार्टीत हुक्का पार्टी, विदेशी मद्यसेवन सुरू असल्याने पोलिसांनी पंचनामा करून गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी संशयित आरोपींकडून हुक्का, महागडी विदेशी दारू, हुक्का फ्लेवर आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोमवारी (दि. 14) इगतपुरी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली. या घटनेतील संशयित आरोपी मोठे व्यापारी असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.