सांगली पुढारी वृत्तसेवा;अरूण साळुंखे: विटा – नेवरी – महाबळेश्वर या नवीन राज्यमहामार्गालगतच्या गावांच्या ठिकाणी कोणतीच वाहतूक सुरक्षितता राहिलेली नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. वळण रस्त्यावरील अतिक्रमणे अपघाताला आमंत्रण देत आहेत. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे अनेकांचा नाहक बळी जात आहे.
या राज्यमहामार्गाची निर्धारित रस्त्याची रुंदी 18 मीटर आहे. मात्र, पुसेसावळी ते विटा या दरम्यान महामार्गाच्या रस्त्याची रुंदी 10 मीटर तर काही ठिकाणी सात मीटर केली आहे. प्रत्येक गावानजीक महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी बंदिस्त गटारी बांधल्या आहेत. यामुळे येथे या मार्गाचे आपोआपच सीमांकन झाले आहे.
या गटारीवरील रस्ता फुटपाथसाठी वापरला जाणे गरजेचे असताना गटारीवर दोन्ही बाजूला अतिक्रमणे झाली आहेत. हॉटेल, नाष्टा सेंटर, पंक्चर दुकान, पानपट्टी, स्टेशनरी, बेकरी, चायनीज गाड्या, भेळ गाड्या आदींनी अतिक्रमणे केली आहेत.
या दुकानांचे ग्राहक महामार्गावरच गाडी थांबवतात. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी होत आहे.
सध्या परिसरातील कारखाने सुरू आहेत. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणार्या अनेक ट्रॅक्टर मागील बाजूस रेडियम पडदा वापरत नाहीत. त्यामुळे अपघात घडत आहेत. प्रत्येक गावाच्या ठिकाणी रस्ता दुभाजक बसवावेत तसेच शाळा, कॉलेज, बस थांबा या ठिकाणी प्रचलित असलेले स्पीडब्रेकर बसवावेत, अशी मागणी होत आहे.