देशात सुमारे 8 कोटी (नेमके सांगायचे झाले तर 7.99 कोटी) भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे. पाळीव कुत्र्यांची संख्या अर्थात वेगळीच आहे. एके काळी ज्या त्या शहरांची महापालिका/नगरपालिका कुत्र्यांना विष देऊन मारत असे. परंतु, हा प्रकार अमानुष म्हणून मेनका गांधी यांनी कुत्री, माकडे अशा प्रचंड वाढणार्या, उपद्रवी ठरणार्या प्राण्यांनाही विष घालून किंवा अन्य मार्गांनी ठार मारण्यावर कायद्याने बंदी आणली.
आजकाल प्रत्येक शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव भयानक वाढला आहे. त्यांची संख्या गणिती श्रेणीने वाढत असते. कुत्र्याचे पिलू वयात आल्यावर त्याला आपली आई आणि बहीण ओळखत नाही. त्यामुळे कुत्र्याची मादी कोणत्याही नराच्या पिल्लांना जन्म देते. कुत्रीला एका वेळी पाच ते सात पिले होत असतात. त्यामुळे गल्लोगल्ली कुत्र्यांची संख्या विपुल प्रमाणावर वाढते. एवढ्या प्रचंड संख्येत असणार्या कुत्र्यांना अन्न-पाणी मिळत नाही.
पन्नास वर्षांपूर्वी बहुसंख्य लोक खंड्या, मोत्या, टिप्या अशी नावे देऊन गावठी कुत्री पाळत. अलीकडे गावठी कुत्र्यांना कोणीही हौसेने पाळत नाही. सध्या सधन लोक पाळण्यासाठी परदेशी जातीची कुत्री आणतात. मग, ही गावठी भटकी कुत्री रस्तोरस्ती भटकत लोकांचे चावे घेत असतात. या कुत्र्यांना कुणी दंशविषप्रतिबंधक सुया टोचत नाहीत. त्यामुळे त्यांचा दंश माणसाला जीवघेणा ठरतो. अनेक गावांत भटक्या कुत्र्यांनी बालकांवर हल्ले करून लचके तोडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशींवरही कुत्री हल्ले करतात. ही कुत्री रात्री-अपरात्री रस्त्याने जाणार्या लोकांवर हल्ले करतात, मागे धावतात. माणसांच्या टोळ्यांप्रमाणेच कुत्र्यांच्याही टोळ्या असतात.
अशा दोन टोळ्यांतील कुत्र्यांच्या मारामार्या माणसासाठीही घातक ठरतात. रस्त्यांवरून अचानक आडवे जाण्याचीही कुत्र्यांना मोठी खोड असते. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांचे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. त्याच अपघातात कुत्र्यांनाही गंभीर इजा होते आणि तेच जखमी स्थितीत भटकत राहतात. त्यांच्यावर कुणीही इलाज, औषधोपचार करत नाही. ही जखमी कुत्री वेदनांनी कळवळत माणसांवर हल्ले करतात.
आता दुसरा भाग असा की, जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे ते प्राणी नागरी वस्तीत प्रवेश करायला लागले आहेत. उसाच्या फडात बिबट्याची मादी बछड्यांना विते हेही आपल्याला गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. नाशिकसारख्या शहरात आणि इतर अनेक गावांत, नगरात बिबटे आणि गवे येतात आणि उच्छाद मांडतात. त्यात वित्त आणि जीवितहानी होते. दैनंदिन व्यवहारांवर दुष्परिणाम होतो.
जंगलातील मांसभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक खाद्य नष्ट होत चालल्याने हे प्राणी सैरभैर झालेले आहेत. चोरट्या शिकारींमुळे, जे मांसभक्षी प्राण्यांचा आहार असतात, असे तृणभक्षी प्राणी संपत चालले आहेत. त्यामुळे वाघ, बिबट्या, तरस यासारखे प्राणी नागरी वसाहतीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडतात. जंगली प्राण्यांचाही हा उपद्रव माणसाला आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे अभियान पालिका राबवतात, हे खरे; पण त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
भटक्या कुत्र्यांचा हा उपद्रव टाळायचा असेल, तर दोन उपाय सुचवावेसे वाटते. एक तर, ही गावठी कुत्र्यांची नवी पिलावळ जन्माला आल्यावर लोकांनी घरोघरी ही पिले पाळायला न्यावीत. त्यांचे अन्न-पाणी, औषधे, लसी टोचणे हे सगळे वेळच्यावेळी करावे. असे झाल्यास प्रत्येक कुत्र्याला पालकत्व मिळेल आणि ती भटकत राहून माणसांना त्रास देणार नाहीत. आणखी एक उपाय असा की, ही सगळी भटकी कुत्री पकडायची आणि जंगलात नेऊन सोडायची, ज्यायोगे वाघ, बिबट्या, तरस यासारख्या प्राण्यांना त्यांचे नैसर्गिक खाद्य मिळेल.
त्यामुळे हे वन्य प्राणी मानवी अधिवासात येणार नाहीत आणि कुत्र्यांमुळे माणसाला होणारा त्रासही आपोआपच टळेल. यात क्रौर्य आहे, असे काहीजण म्हणतील; पण तसे काही नाही. निसर्गाचे चक्र त्यामुळे अबाधित राहणार आहे. 'जीवो जीवस्य जीवनम्' हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसार छोटे प्राणी खाऊन कुत्री जगतील आणि कुत्र्यांना खाऊन मोठे प्राणी जगतील. वन्यजीवन आणि माणूस यांचे संतुलन साधेल.
– श्रीराम ग. पचिंद्रे