नाशिक : नमामि गोदाच्या परवानगीचा वाद; आमदारांसह भाजप नेते पोलिसांशी भिडले

नाशिक : नमामि गोदाच्या परवानगीचा वाद; आमदारांसह भाजप नेते पोलिसांशी भिडले
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'नमामी गोदा' प्रकल्प उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडताच पोलिसांनी आयोजक महापौर सतीश कुलकर्णी आणि भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपचे तिन्ही आमदार व स्थानिक पदाधिकार्‍यांनी पोलिसांच्या कारवाईचा जोरदार विरोध केला. यावेळी पोलिस आणि भाजप पदाधिकार्‍यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेता पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले.

'नमामी गोदा' या उद्घाटन कार्यक्रमाची परवानगी घेतली नसल्याने, सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित व पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे हे फौजफाट्यासह कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील कार्यक्रमस्थळावरून निघताच त्यांनी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आणि महापौर सतीश कुलकर्णी यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. तसेच आमच्यासोबत पोलिस ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. मात्र, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह भाजप नेते लक्ष्मण सावजी, विजय साने व काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना चांगलेच खडेबोल सुनावले. शहरात घडलेल्या गुन्ह्यांची अद्याप उकल करता आली नाही. दिवसाढवळ्या जे गुन्हेगार दरोडा घालतात, हत्या करतात असे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक करण्याचे आपण धाडस दाखवत नाही. आम्ही गुन्हेगार आहोत काय? तुम्ही कोणत्या कायद्यांतर्गत आमच्यावर अशा प्रकारची कारवाई करता? असे एकापाठोपाठ एक सवाल उपस्थित केले.

यावेळी मधुकर गावित व सीताराम कोल्हे यांनी आम्हाला आदेश आहेत. तुम्हाला सहकार्य करावे लागेल, असे वारंवार सांगितले. मात्र तिन्ही आमदारांनी तीव्र विरोध केल्याने, काही काळ वातावरण तापले होते. पोलिसांनी अधिक कुमक मागविल्याने, कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम पोलिसच करीत असल्याचा आरोप केला. साधारणत: अर्धा तास हे नाट्य चालल्यानंतर पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

दरम्यान, विनापरवानगी कार्यक्रम घेतल्याप्रकरणी रात्री उशिरा महापौर सतीश कुलकर्णी व भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यावर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांआडून राज्य सरकारचा दबाव : भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी महाविकास आघाडी सरकार हे पोलिसांआडून भाजप पदाधिकार्‍यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. त्याचबरोबर पोलिसांच्या गुंडगिरीला आम्ही घाबरत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

भाजप कार्यालयातही पोहोचले पोलिस
पोलिसांशी बाचाबाची झाल्यानंतर भाजपचे सर्व पदाधिकारी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ पोलिसदेखील या ठिकाणी पोहोचले. येथेही पोलिसांनी पदाधिकार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पदाधिकार्‍यांनी, तुम्ही लेखी कारवाई करा, आम्ही न्यायालयात दाद मागू अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी आयोजकांना नोटीस बजावली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news