हवेपासून तयार केला आकर्षक मौल्यवान हिरा | पुढारी

हवेपासून तयार केला आकर्षक मौल्यवान हिरा

न्यूयॉर्क : अमेरिकेतील एक प्रमुख शहर असलेल्या न्यूयॉर्कमधील एका लक्झरी ज्वेलरी कंपनीने हवेपासून हिरा तयार केला आहे. एथर असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, हा हिरा प्रयोगशाळेत तयार झाला असून, यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापर करण्यात आला आहे.

‘डेलीमेल’ने दिलेल्या माहितीनुसार, हवेत उपलब्ध असलेल्या कार्बनडाय ऑक्साईडच्या मदतीने हा हिरा तयार करण्यात आला आहे. कंपनीने सांगितले की, कार्बनडाय ऑक्साईड हे एक वायू प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आहे. मात्र, याच वायूचा उपयोग करून नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हिरा बनविता येऊ शकतो. हवेपासून तयार करण्यात आलेला हा हिरा फिजिकली आणि केमिकली अशा दोन्ही प्रकारे खर्‍याखुर्‍या हिर्‍यासारखाच आहे; जो खाणीतून काढण्यात येतो.

हा हिरा चार टप्प्यांत तयार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वातावरणातून कार्बनडाय ऑक्साईड वायूला वेगळे म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करण्यात आले. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हायड्रोसिन्थसिस प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वेगळ्या करण्यात आलेल्या कार्बनडाय ऑक्साईडचे हायड्रोकार्बनमध्ये रूपांतरित करण्यात आले. त्यानंतर हायड्रोकार्बनला रासायनिक वाफेच्या मदतीने हिर्‍यात रूपांतरित करण्यात आले.कंपनीने या हिर्‍याची किंमत किती होईल, हे सांगितले नसले तरी कार्बनडाय ऑक्साईडच्या मदतीने हिरा तयार केल्याने प्रदूषण कमी होण्यास मदतही मिळणार आहे.

Back to top button