सातारा : उदयनराजेंची भूमिकाच दुटप्पी : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा : उदयनराजेंची भूमिकाच दुटप्पी : आ. शिवेंद्रराजे

सातारा : पुढारी वृत्तसेवा
दुसर्‍याला दुटप्पी बोलण्यापेक्षा तुमची भूमिकाच दुटप्पी आहे. तुम्ही काही न करता स्वत:चा डांगोरा वाजवत स्वत:लाच शाबासकी देत आहात. मी सर्व केले आहे असे म्हणणे म्हणजे दुर्देवाची गोष्ट आहे. मला या गोष्टीत इन्ट्रेस्ट नाही, अशी टिका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे यांच्यावर केली. सुरुची बंगला येथे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, खासदारांनी माझ्यावर जी टिका केली आहे त्याला उत्तर द्यायची गरज वाटत नाही. त्यांना आत्ताची परिस्थिती कळून चुकली आहे. पाच वर्षापूर्वी आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र पाच वर्षे तुम्ही काय केले ते सांंगा. तुम्ही सत्ता घेतली त्यावेळी सर्वसामान्य घरातील स्त्रिला सत्तेवर बसवतो असे सांगितले. आज त्यांना काम करु दिले का? त्यांना अधिकार ठेवले होते का? याचे उत्तर द्या.

मला उदयनराजेंच्या प्रतिक्रियेवर उत्तर द्यावे, असे वाटत नाही. त्यांचे पत्रक जे तयार करतात त्यांचीच आता कीव यायला लागली आहे. कोणताही विकासाचा विषय नाही. कोणती कामे केली हे दाखवत नाहीत. कुठंतरी कारखान्यावर बोल, कुठं दुसरे काही तरी बोल, दुसर्‍याने केलेल्या कामाचे नेहमीसारखे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करायचा ही त्यांची सवयच असल्याची टिका आ. शिवेंद्रराजे यांनी केली. सातार्‍यात नगरपालिकेने काय विकास केला? नुसती जाहीरातबाजी, मीपणा हे एवढंच सुरु आहे. विकास केला तर तो दिसला पाहिजे, अशीही टिका त्यांनी केली.

हेही वाचलत का ?

Back to top button