श्रीलंकेमधून अयोध्याकडे निघालेल्या श्रीराम वनगमन पथ काव्ययात्रेचे नाशकात स्वागत | पुढारी

श्रीलंकेमधून अयोध्याकडे निघालेल्या श्रीराम वनगमन पथ काव्ययात्रेचे नाशकात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; प्रभू श्रीरामचंद्र वनवासाच्या कालावधीत ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून काढण्यात आलेल्या श्रीराम वनगमन पथ काव्ययात्रेचे आगमन शनिवारी (दि. 11) नाशिकमध्ये झाले. या यात्रेचे उत्साहात स्वागत नाशिककरांतर्फे करण्यात आले.

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्रीलंकेमधून श्रीराम वनगमन पथ काव्ययात्रेचा शुभारंभ झाला आहे. नाशिकमध्ये या यात्रेचे आगमन झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा काढण्यात आली. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी भाविकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. सायंकाळी ही यात्रा पेठ नाका येथील कैलास मठ येथे पोहोचली. रथयात्रेदरम्यान, जगदीश मित्तल, अशोक बत्रा, डॉ. शंभू मनोहर, प्रवीण मित्तल, पवन गोयल, के. सी. पांडे, डॉ. चंद्रिका प्रसाद मिश्र, नेमीचंद पोतदार आदी उपस्थित होते.

रथयात्रेनिमित्ताने विश्व हिंदू परिषद, नाशिक सेवा समितीसह समविचारी संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रथयात्रेदरम्यान किष्किंधा, पंचवटी (नाशिक), चित्रकुट आणि अयोध्या येथे कविसंमेलन होणार आहे.

रामनवमीला यात्रा अयोध्येत
राष्ट्रऋषी अशोक सिंघल यांना समर्पित ही रथयात्रा सुमारे 7 किलो वजनी चांदीच्या पादुका घेऊन निघाली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून 41 दिवसांत 232 विविध शहरांमधून सुमारे 6500 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तसेच रामनवमीच्या मुहूर्तावर ही रथयात्रा अयोध्येत पोहोचणार आहे.

हेही वाचा :

Back to top button