

कराड पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कराड (karad) शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ऑलआऊट मोहीम राबवली.
शुक्रवार दि. 11 रोजी रात्री अचानक राबवलेल्या या मोहिमेअंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेली काही दिवसांपासून चोर्या, दरोडा यासह गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक बसावा या उद्देशाने जिल्ह्यात ऑल आउट मोहीम राबवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री अकरा ते शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत अचानकपणे ऑल आउट मोहीम राबवली.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणांसह, पारधी वस्त्या त्यामध्ये कोल्हापूर नाका व दांगट वस्ती येथे पोलिसांनी अचानकपणे तपासणी केली.
या मोहिमेमध्ये शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करण्यात आली होती. त्या विविध पथकांच्या माध्यमातून राबवलेल्या मोहिमेत पोलिसांना संशयास्पदरित्या फिरणार्या तसेच चोरी किंवा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या, किंबहुना रेकॉर्डवरील गुन्हेगार व पोलिसांना हवे असणारे संशयित, हद्दपार असणारे संशयित यांचा पोलिसांनी शोध घेतला.
त्यामध्ये संशयास्पदरीत्या फिरत असणार्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. तसेच अन्य सहा जणांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. याशिवाय रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार व हिस्ट्री सिटर दोघे असे एकूण 16 जणांवर पोलिसांनी ऑल आऊट मोहिमेदरम्यान कारवाई केली.
डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक तसेच 50 हून अधिक पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.