नाशिक : विद्यार्थ्यास परदेशात पाठवण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले | पुढारी

नाशिक : विद्यार्थ्यास परदेशात पाठवण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यास परदेशात पाठवण्याचे आश्वासन देऊन पालकाकडून लाखो रुपये घेत त्यास परदेशात न पाठवणार्‍या शहरातील एका शिक्षण सल्लागार अकॅडमीच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांत नारायण दगू शिंदे (47, रा. मखमलाबाद रोड) यांच्या फिर्यादीवरून संशयित रागिनी प्रफुल्ल सोमठाणकर (रा. कॉलेजरोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे यांच्या फिर्यादीनुसार सप्टेंबर 2020 पासून संशयितेने आर्थिक गंडा घातला. शिंदे यांचा मुलगा प्रीतेश यास फ्रान्स किंवा इटलीत शिक्षणासाठी जायचे होते. त्यासाठी लागणारा प्रवेश, व्हिसा, शिष्यवृत्ती आदी प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी इंग्लिश लर्निंग अकॅडमी अ‍ॅण्ड स्टडी अॅब्रॉड कन्सल्टन्सीच्या संशयित सोमठाणकर यांनी शिंदे यांच्याकडून ऑनलाइन एकूण दोन लाख 80 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात सोमठाणकर यांनी प्रवेशप्रक्रिया केली नाही. शिंदे यांनी प्रवेशाबाबत चौकशी केली असता सोमठाणकर यांनी प्रीतेशचा प्रवेश नाकारण्यात आला असून, तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याचप्रमाणे सुरक्षारक्षकांकडून हातपाय तोडण्याची धमकीही सोमठाणकर यांनी शिंदे यांना देत कार्यालयातून जाण्यास सांगितले.

यामुळे दोन वर्षांपासून संबंधित विद्यार्थ्याचे शिक्षण थांबलेे. त्यामुळे शिंदे यांनी वर्षभर सातत्याने याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही संशयितेने पैसे देण्यास नकार देत दमदाटी केली. यामुळे शिंदेंचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले. या प्रकरणी शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली. शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. राहुल पाटील यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button