MLA Shivendra Raje : उदयनराजेंची बुद्धी भ्रष्ट झालीये, त्यांनी वाढदिवसाला डोंबाऱ्यांचा खेळ केला, शिवेंद्रराजेंची टीका | पुढारी

MLA Shivendra Raje : उदयनराजेंची बुद्धी भ्रष्ट झालीये, त्यांनी वाढदिवसाला डोंबाऱ्यांचा खेळ केला, शिवेंद्रराजेंची टीका

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कारखान्याचा भ्रष्टाचार उघड करणार असे खासदार उदयनराजेंनी सांगत कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप केलाय. यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनजेंवर सडकून टीका केलीये. (MLA Shivendra Raje)

कारखान्याला ऊस घालणाऱ्यांनी कारखान्याबद्दल बोलावे. उदयनराजे सभासद नसल्याने उसाचा आणि त्यांचा संबंध नाही. त्यांनी कधी शेती केली नाही. वय वाढेल तसे त्यांची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली आहे.. कारखान्यावर बोलणारे उदयनराजे कोण असा सवाल उपस्थित करत त्यांनी सडकून टीका केलीये.

मी छत्रपतीच्या विचारांचा आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार उदयनराजेंना कोणी दिला. छत्रपतींच्या विचाराने चालणारे उदयनराजे असते तर लोकसभेला का पडले? रात्रीच्या गाड्या फिरवायच्या आणि मोठ्या आवाजाची गाणी लावून गावातून फिरायचे हे छत्रपतींचे विचार आहेत का? जसे यात्रेमध्ये डोंबाऱ्याचे खेळ असतात तसे उदयनराजेंनी वाढदिवसाला डोंबाऱ्यांचा खेळ केलाय याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे असे सांगत छत्रपतींच्या विचारांची जाणीव शिवेंद्रराजेंनी करून दिली.

MLA Shivendra Raje : उदयनराजे काय म्हणाले ?

छत्रपती घराण्याचा वारसा सांगताना महाराजांचे आचार-विचार आचरणात आणून जोपासले पाहिजेत. चांगल्या कामांमध्ये राजकारण आणून काही लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करीत बदनाम केले जात आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारी संस्था स्थापन केल्या जात आहेत.

अजिंक्यतारा कारखान्यांमधील शेअर्सदार हा प्रत्येकजण कारखान्याचा मालक आहे. ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही, असे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले आहे.

कारखान्याच्या नावाखाली चाललेला अतिरेक हा कुठेतरी थांबवला पाहिजे. कारखाना हा लोकांच्या कष्टावर उभा केलेला आहे. कारखान्याच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार झाला आहे आणि तो वेळ आली की मी उघड करणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुद्दामहून गळचेपी केली जात आहे, असा आरोप कोणाचेही नाव न घेता उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी केला.

Back to top button