नाशिक : कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत महापालिका घालणार शासनाला साकडे | पुढारी

नाशिक : कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत महापालिका घालणार शासनाला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करून शहरवासीयांना निर्बंधमुक्त करण्यात यावे, अशी मागणी नाशिक महापालिका शासनाकडे पत्राद्वारे करणार आहे. या पत्राद्वारे शहरात झालेल्या एकूण लसीकरणाविषयी सविस्तर माहिती देऊन निर्बंधांसंदर्भात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून नाशिक शहराला वगळावे, अशी सूचना केली जाणार आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये सर्वांचेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. प्रत्येकजण आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाल्याने तिसर्‍या लाटेपूर्वी घातलेले निर्बंध पूर्णपणे काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. शहरात कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस 95 टक्के पूर्ण करण्यात आलेला असून, त्या तुलनेत ग्रामीण भागातील लसीकरणाची गती मंदावलेली आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाच्या अल्प प्रमाणामुळे शहरात कोरोना निर्बंध शिथिल होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेत एकूण 19 लाख 52 हजार 745 संशयित रुग्ण आढळून आले.

बाधितांपैकी चार हजार 105 जणांचा मृत्यू झाला. शासनाने जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात केली. जानेवारी महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने तिसर्‍या लाटेचा प्रभाव जाणवला नाही. गेल्या 23 जानेवारीला नाशिक शहराची सक्रिय रुग्णसंख्या 10 हजार 948 होती. आता हाच दर घटला असून, सध्या शहरात 100 सक्रिय रुग्णांची नोंद आहे. शहरासाठी 13 लाख 63 हजार 700 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 12 लाख 98 हजार 180 (95 टक्के) नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचे प्रमाण 95 टक्के आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 10 लाख 14 हजार 375 आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील लसीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा परिणाम निर्बंध शिथिलीकरणावर झाला आहे. शहरात 100 च्या आत रुग्ण असून, निर्बंध शिथिल करण्याची मागणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना प्रशासनाने केली आहे.

34 ठिकाणी लसीकरण केंद्रे
सध्या झाकिर हुसेन रुग्णालयात एक, तर बिटको रुग्णालयात चार कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड प्रादुर्भावापासून सर्वांत कमी रुग्णसंख्या आतापर्यंतची ठरली आहे. महापालिकेच्या तीस प्राथमिक आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त अन्य चार अशा 34 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत.

हेही वाचा :

Back to top button