नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे इंधनाची दरवाढ झाल्याची वार्ता नाशिकमध्ये वार्यासारखी परसली. त्यामुळे पेट्रोलपंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी सोमवारी (दि. 7) रांगा लागल्या. काही पेट्रोलपंपचालकांनी इंधन संपल्याचे सांगत पंप बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय झाली. जिल्हा पुरवठा विभागाने या सर्व प्रकारची दखल घेत पथकांमार्फत तपासणी केली असता कोठेही पेट्रोलपंप बंद अथवा इंधन संपल्याचे आढळून आले नाही.
गेल्या पंधरवड्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटले आहे. त्यामुळे इंधन दरांचा भडका उडण्याची अटकळ बांधली जात आहे. त्यातच सोमवारी (दि. 7) उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. तसे मध्यरात्रीपासून इंधनाचे दरवाढ होणार असल्याची अफवा पसरली. हे दर 13 रुयांपर्यंत पोहोचतील अशीही चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक शहर व परिसरातील पेट्रोलपंपावर नागरिकांनी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यातच दरवाढीच्या चर्चेमुळे काही पंपांवर सायंकाळनंतर पेट्रोल-डिझेल संपल्याचे फलक झळकल्याने चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
इंधन दरवाढीवरून उठलेले मोहोळ बघता जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी (दि. 8) सकाळपासून पेट्रोलपंपांची तपासणी सुरू केली. नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी कार्यालय व नाशिक तहसीलदार यांच्या संयुक्त पथकामार्फत ही तपासणी करण्यात आली. तेव्हा पेट्रोलपंपाचे काम सुरळीत सुरू असल्याचे तसेच कोठेही अतिरिक्त साठा आढळून आला नाही. त्यामुळे दरवाढ आणि त्यातून इंधनाची साठेबाजी ही अफवाच ठरली आहे.
नाशिक तहसील व शहर धान्य वितरण कार्यालयाच्या पथकांनी शहर-परिसरातील पेट्रोलपंपाची तपासणी केली. त्यात कोठेही पंप बंद असल्याचे व इंधनाची साठेबाजी केल्याचा प्रकार आढळून आलेले नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.
– डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक