पणजी : स्मार्ट सिटीतील, स्मार्ट खांब | पुढारी

पणजी : स्मार्ट सिटीतील, स्मार्ट खांब

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. जागतिक पर्यटन असलेल्या गोव्याची पणजी राजधानी आहे. त्यामुळे या शहराचा विकास करताना शहर सुंदर असणे अपेक्षीत आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा असणारी कुठलीच वस्तू शहरात दिसू नये. स्मार्ट सिटी म्हणून विकास करताना सर्व सुविधा नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्यात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करताना अनेक उद्याने सुशोभिकरणे करण्यात आली. पदपथ बांधण्यात आले. मात्र, हे पदपथ बांधताना त्याठिकाणी असलेले विजेच्या खांबाचे अर्धवट बुंधे तसेच ठेवण्यात आले आहेत. सदर खांबावरील विजेच्या वाहिन्या तिथेच गुंडाळून ठेवण्यात आल्यामुळे खांबाला स्पर्श करणार्‍याला विजेचा झटका बसण्याची शक्यता आहे. सदर मोडलेले खांब पादचार्‍यांना बरेच त्रासदायक ठरत आहेतच, त्याचसोबत पणजीच्या सौैंदर्यांलाही बाधा पोहोचवत आहेत.

चिंचोळे पणजी परिसरातील पदपथावर रस्त्याच्या बाजूला असाच एक अर्धवट खांब आहे. पणजी मार्केट परिसरामध्ये असलेल्या असलेल्या अर्धवट खांबामुळे येथील गटार व्यवस्थेला अडचण होत असून त्याचा पार्किंगलाही त्रास होत आहे. सांतीनेज येथेही पदपथावर असाच एक तुटलेला खांबाचा बुंधा आहे. त्यामुळे चार चाकी वाहने पार्किंग करताना चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

भाटले येथील पदपथावर मोडून पडलेला विजेचा खांब तसाच असून पादचार्‍यांना या पदपथावरून ये-जा करताना तो त्रासदायक ठरतो. खांबातून बाहेर आलेल्या वीज वाहिन्या धोकादायक स्थितीत असून त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोेका आहे. त्यासोबत या खांबाचा खालचा भाग पादचार्‍यांसाठी अडचण ठरत आहे. असे अनेक अर्धवट खांब पणजी शहरात आहेत. ते विशेषत: पादचार्‍यांना त्रासदायक ठरत आहेत.

हेही वाचलत का ? 

Back to top button