नाशिक : अखेर 14 हजार किलो तांदूळ घोटाळ्याची चौकशी सुरू | पुढारी

नाशिक : अखेर 14 हजार किलो तांदूळ घोटाळ्याची चौकशी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने अपात्र ठरवलेल्या 13 ठेकेदारांपैकी श्री स्वामी विवेकानंद महिला स्वयंसहाय्यता बचतगटाने दोन वर्षांपासून दडवून ठेवलेल्या 14 हजार किलो तांदळाच्या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी समितीतील चार सदस्यांनी संबंधित गोदामाची पाहणी करून माहिती घेतली. महापालिकेची झालेली फसवणूक तसेच शासनाचा तांदूळ दडवून ठेवण्याबाबतची चौकशी करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत 13 सेंट्रल किचन शेडची तपासणी करण्यात आली असता त्यात काही महिला बचतगटाच्या प्रतिनिधींना हिरावाडी येथील ठाकरे मळा परिसरातील स्वामी विवेकानंद बचतगटाच्या गोदाम तपासणीत 14 हजार किलो वजन असलेली 281 तांदळाची पोती आढळून आली होती. जवळपास एक लाख 15 हजार विद्यार्थ्यांना पुरेल इतका तांदूळ साठा दडवल्याचे समोर आले. या प्रकरणाची मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी गंभीर दखल घेत तपासणी करून पंचनामा केला. त्यावर संबंधित तांदूळसाठा ठेकेदारानेच दडवल्याचे समोर आले. या आधी मात्र याच ठेकेदाराने मनपाकडे अहवाल सुपूर्द करताना आपल्याकडे शासनाचा तांदूळ शिल्लक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या घटनेबाबत शालेय पोषण आहार योजनेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाकडे शिक्षणाधिकारी धनगर यांनी अहवाल पाठविल्यानंतर त्यांनी तत्काळ चौकशी समिती गठीत करण्यात आली.

समितीने मंगळवारपासून (दि.8) चौकशी सुरू केली असून, समितीत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, पोषण आहार योजनेचे लेखाधिकारी श्रीधर देवरे व दहावी व बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे समिती सदस्य असलेले प्रशांत गायकवाड यांना वगळून त्यांच्या जागेवर दिंडोरी पंचायत समिती पोषण आहार अधीक्षक रूपाली पगार यांचा समावेश आहे.

तांदूळ घोटाळा प्रकरणात प्रशासनाधिकारी धनगर यांनी केलेल्या पंचनाम्यात शासनाचा 14 हजार किलो तांदूळ ठेकेदाराचाच असल्याचे समोर आले होते. तर दुसरीकडे ठेकेदाराने आपल्याकडे शासनाचा तांदूळच नसल्याचा लेखी अहवाल या आधी सादर केला होता. त्यामुळे शासनाची फसवणूक करणे, शासकीय धान्य दडवून ठेवण्यासारख्या गंभीर बाबी समोर आल्या असून, शासनाचे धान्य ज्या बंगल्यात साठविले तो बंगला कुणाचा आणि याबाबत त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग आहे का या बाबींची तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button