सातारा पुढारी वृत्तसेवा: एकतर्फी प्रेमातून खून होण्याच्या संतापजनक घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. पिंपोडे बु॥ मध्ये काल-परवा घडलेल्या घटनेने अतिरेकी व हिंसाचारी प्रवृत्ती नव्याने समोर आली. अशा घटना का घडतात? त्या घटनानंतर कोण अन् काय बोध घेतो? तशा घटना रोखण्यासाठी खरोखरच ठोस उपाययोजना व जनजागृती होते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
खून करणार्या विकृत मनोवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी कायद्याची जरब निर्माण करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच पालकांच्या सुसंस्काराची व संवेदनशील समाजाची निकडही प्रकर्षाने जाणवत आहे.
पिंपोडे बु॥, ता. कोरेगाव येथील बसस्थानक परिसरात पेट्रोल पंपानजीक श्रीराम किराणा स्टोअर्स दुकान आहे. त्याच्या वर असलेल्या मजल्यावर एक खासगी कोचिंग क्लास आहे. इयत्ता 11 वी वाणिज्य शाखेत शिकत असलेली अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी क्लाससाठी आली होती.
क्लास 9.30 वाजता सुरू होणार होता. त्याठिकाणी शिक्षक उपस्थित नसल्याची संधी साधून विकृत मनोवृत्तीच्या निखिल कुंभार याने निर्घृणपणे अल्पवयीन मुलीचा खून केला. या प्रकाराने क्लासमध्ये व बसस्थानक परिसरात एकच हलकल्लोळ उडाला. या संतापजनक घटनेने अवघे समाजमन हादरून गेले. एकतर्फी प्रेम किती विकृत आहे हेच या घटनेने दाखवून दिले.
ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केले जाते तिलाच अत्यंत निर्दयीपणे संपवणे ही विकृती नाही तर काय? या विकृतीमुळे किती कळ्या खुडल्या जाणार? एकतर्फी प्रेमातून बळी गेलेल्या कितीतरी मुलींची नावे समोर येतात. अशा घटनांना नक्की जबाबदार कोण? एखादा जीव घेण्यापर्यंत का जाते मजल? त्यासाठीची परिस्थिती निर्माण होत असताना त्याकडे होणारे दुर्लक्ष गंभीर समस्येला निमंत्रण तर देत नाही ना?पालकांना घटना घडेपर्यंतची परिस्थिती खरोखरच माहिती होत नसते का? हे प्रश्न सतावणारे आहेत.
त्यावर विचारमंथन होणेही गरजेचे आहे. केवळ पोलिसी खाक्या दाखवून अशा घटना रोखता येणार नाहीत तर त्यासाठी पालक व समाज म्हणूनही काही भूमिका घ्यावी लागणार आहे. तरच अशा घटना टळतील, अशी सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे.
एकतर्फी प्रेम अनेक समस्या निर्माण करत असते. अनेकदा मुलींच्या सरळ व भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे. अर्थाचा अनर्थ काढून व मुलीच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष करून प्रेमाचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र, वास्तव जेव्हा समोर येते तेव्हा मात्र एकतर्फी प्रेम करणारा हिंस्ञ बनतो. त्यातून जीवघेण्यापर्यंत त्याची मानसिकता तयार होत जाते अन् नको ते समोर येते. काही वेळा मुलीने प्रेमाला नकार दिल्याच्या रागातूनही अप्रिय घटना घडू लागल्या आहेत. पिंपोडे बु॥ येथील घटनेने तर लोकांचा संताप अनावर झाला.
एकतर्फी प्रेम करणार्या निर्दयी प्रवृत्तीने जीव घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वास्तविक या प्रकरणी स्थानिक पातळीवर उद्रेक होण्याइतपत परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे होती. मात्र, तसे काही झालेले दिसत नाही. अशा घटनांनी खरोखरच चीड येत नाही का? चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी वज्रमूठ आवळायला नको का?
एकतर्फी प्रेम करणारे महाभाग काही कमी नाहीत. स्वत:च्याच विश्वात वावरणारी ही जमात समाजाच्या अक्षरश: मुळावर उठू लागली आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्या अशा प्रवृत्तीमुळे दोन्ही बाजूची कुटुंबे आयुष्यात उठत आहेत.
राग असतो काही क्षणाचा पण जीव मात्र जातो निष्पाप मुलीचा. आजपर्यंत घडलेल्या अशा बहुतेक सर्वच घटनांना खून करणारे संशयित युवकच कारणीभूत आहेत. त्यांची मानसिकता गुन्हेगारी वृत्तीची होत असल्यामुळे हे प्रकार वाढू लागले आहेत.
हे जरी खरे असले तरी दुसरीकडे संबंधित घटनांच्या मुळाशी जावून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र, अशा घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याचे दिसून येते.