नाशिक : गौरव अहिरे ; दोघांची फेसबुकवर ओळख झाली. काही क्षणांत त्याने तिचा मोबाइल क्रमांक मिळवला (?). त्यानंतर व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केले आणि व्हिडिओ कॉलवर संवाद साधण्याची उत्सुकता शिगेला गेली. त्याने काही मिनिटांच्या ओळखीवर आंधळा विश्वास ठेवून व्हिडिओ कॉल केला. तिने नेहमीप्रमाणे तिचा चेहरा झाकलेला होता आणि त्याला कपडे काढण्यास प्रोत्साहित केले. त्यानेही दोघांच्या मनाप्रमाणेच केले. काही क्षण आनंद घेतल्यानंतर व्हिडिओ कॉल कट केला. त्यानंतर त्याच्या व्हॉट्सअॅपवर काही क्षणांपूर्वी घेतलेल्या आनंदाची अश्लील चित्रफीत आलेली होती. सोबत मागणी होती हा 'व्हिडिओ व्हायरल होऊ द्यायचा नसेल, तर पैसे दे.'
वरील प्रकार अनेकांसोबत किंवा ओळखींच्यासोबत झालेले असतात किंवा ऐकीवात असतात. मात्र, त्याबाबत जनजागृती नसल्याने आणि बदनामी होईल, या भीतीपोटी अनेक जण सुरुवातीच्या आनंदाला व त्यानंतरच्या दु:खाला बळी पडतात. सोशल मीडियावरील सुरक्षिततेबाबत असलेली निरक्षरता याला कारणीभूत ठरते. सायबर पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी अशाप्रकारे चॅटिंग करून खंडणीची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
शहरात अशा प्रकरणी एकच गुन्हा दाखल आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेकांना व्हर्च्युअल सेक्सचा आनंद देऊन खंडणीची मागणी केली जात असते. फेसबुकवरील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून खंडणी मागणारे तो व्हिडिओ नातलग, मित्रमंडळींना पाठवण्याची धमकी देतात. विचार करण्यासही वेळ न देता, खंडणीखोर पैशांची मागणी करतात. भीतीपोटी अनेक जण पैसे पाठवून देतात, तर मोजकेच लोक याकडे दुर्लक्ष करतात व सावध होऊन संबंधित खाते रिमूव्ह करून स्वत:चे प्रोफाइल सुरक्षित करतात. त्यानंतरही त्यांना होणारा त्रास सुरूच असतो. मात्र, दुर्लक्ष केल्यास त्रास बंद होतो.
घाबरल्यास पैसे दिल्याशिवाय किंवा पोलिसांकडे तक्रार करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सोशल मीडियावरील क्षणिक प्रेमाच्या, शरीरसुखाच्या आनंदाच्या मोहात सर्वस्व गमावण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींना ज्या प्रमाणे आपण घरात घेत नाही, त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही त्यांना थारा नको, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधताना मर्यादा ओलांडू नये. समोरच्याचा चेहरा दिसत असेल आणि तो ओळखीचा असेल, तर संवाद साधणे शहाणपणाचे असते. मात्र, काही मिनिटांत आपण चॅटिंगवरून व्हिडिओ कॉलपर्यंत प्रगती केल्याचा आनंद त्या व्यक्तीला पुढचे काही दिवस आर्थिक संकटात व नैराश्यात ढकलतात.