गोवा विधानसभा : मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांकडे राजीनामा ; नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा | पुढारी

गोवा विधानसभा : मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांकडे राजीनामा ; नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दुपारी राजभवनावर जाऊन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांना पुढील सरकार अस्तित्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केल्यावर त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती राज्यपालांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सकाळी पणजीत आल्यानंतर 9.00 वाजता मिरामार येथे जाऊन राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली वाहिली. त्यावेळी भाऊसाहेबांच्या कनिष्ठ कन्या ज्योती बांदेकर , भाऊसाहेबांचे नातू यतीन काकोडकर, समीर काकोडकर, डिचोलीतील विजयी उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि सुभाष वेलिंगकर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी मिरामार येथे आदरांजली वाहिल्यानंतर जुन्या सचिवालय परिसरातील पुतळ्यास आणि विधानसभा संकुल परिसरातील भाऊसाहेबांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री तेथून मंत्रालयातील आपल्या कार्यालयात गेले. तेथे काही महत्त्वाचे काम हातावेगळे करायचे होते ते त्यांनी केले आणि शासकीय निवासस्थान गाठले. तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले. ते दोघेही दुपारी पावणे बाराच्या दरम्यान राजभवनात गेले. तेथे मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही मिनिटांत आपला राजीनामा सादर केला.

हा राजीनामा सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले,की जनतेने सरकारच्या कार्यकाळात चांगले सहकार्य केले म्हणून जनतेचे आभार मानणारा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत केला होता. त्याशिवाय विधानसभेचा कार्यकाल संपत आल्याने ती बरखास्त करावी, अशी शिफारस राज्यपालांना करणारा ठरावही संमत केला होता. हे दोन्ही ठराव राज्यपालांना सादर केले आहेत.

मुख्यमंत्री राजभवनावरून तडक शासकीय निवासस्थानी आले. तेथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे, प्रदेश संघटन सचिव सतीश धोंड यांच्यासह कुंडई येथील तपोभूमी गाठली. तेथे मयेतील विजयी उमेदवार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांचे अवतरण दिनानिमित्त दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर पणजीतील कामकाज आटोपून सायंकाळी मुख्यमंत्री साखळी येथील खासगी निवासस्थानाकडे रवाना झाले.

हेही वाचलत का ?

Back to top button