मुबंई ; पुढारी ऑनलाईन : माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येत असल्याचे खासदार राणे यांनी म्हटले आहे. राणेंच्या या व्यक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर ठाण्यातील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप भाजपकडून होत आहेत. मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. दरम्यान राणेंच्या या वक्तव्यावरून वेगळा वाद निर्माण झाला आहे.
निलेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते यावेळी ते म्हणाले की, मला संशय येतोय की पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. अनिल देशमुख यांनी काय केलं होतं ? त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला. तेव्हा विचार केला का ? मग नवाब मलिक कोण आहेत.
नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात ? ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसाला पैसे दिले. बॉम्बस्फोटातील आरोपीला पैसे दिले, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असं निलेश राणे म्हणाले होते.
निलेश राणे यांनी केलेल्या टीकेबद्दल धनंजय मुंडे यांना विचारले असता, कोण निलेश राणे? असा मिश्कील सवाल धनंजय मुंडेंनी केलाय.
निलेश राणे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला. गेली ५५ वर्षे पवार यांनी महाराष्ट्राची आणि देशाची सामाजिक कार्यातून आणि राजकारणाच्या माध्यमातून अविरत सेवा केली आहे आणि आजही ते करत आहेत.
हे कदाचित निलेश राणेंना माहिती नाही. पवार यांच्यावर टीका करण्याची पात्रता निलेश राणेंची नाही. राणेंची तेवढी पात्रता असती तर, ते आज यशस्वी राजकारणी असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.