Karnataka Congress : राज्यात काँग्रेस 1 कोटी सदस्य करणार नोंदणी | पुढारी

Karnataka Congress : राज्यात काँग्रेस 1 कोटी सदस्य करणार नोंदणी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटकमध्ये काँग्रेसकडून डिजिटल सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस समितीच्यावतीने सदस्य नोंदणीसाठी नियुक्‍त करण्यात आलेले प्रभारी आणि माजी केंद्रीयमंत्री सुदर्शन नचियप्पन यांनी दिली.येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदस्य नोंदणीचे प्रभारी मोतीलाल देवंगे, माजी आ. आर.के. व्ही. व्यंकटेश, प्रभुनाथ डायमन, सुरेश हेगडे, अशोक कुमार, आ. चन्नराज हट्टीहोळी, माजी आ. फिरोज सेट, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, शहर जिल्हाध्यक्ष राजू सेट आदी उपस्थित होते.

नचियप्पन म्हणाले, ग्रामीण स्तरापासून आम्ही सदस्य नोंदणीला प्रारंभ करत आहोत. राज्यामध्ये युवा वर्ग, शेतकरी, कामगार आदींसह सुमारे एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. हा अहवाल निवडणूक आयोगालाही देणार आहोत. त्यानंतर पक्षाची केंद्रीय कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. याबाबत चिंतन करून पराभवाची कारणे शोधण्यात येतील. यापूर्वीही अशा अनेक संकटातून काँग्रेस पक्ष गेला आहे. त्यामुळे विरोधकांंनी काँग्रेस पक्ष संपला असे समजू नये. आमच्या पक्षाला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. यापुढे लोकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील. राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये सदस्यत्व मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाजप जातीच्या आधारावर सत्तेवर आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचलत का ?

Back to top button