पाण्यात बुडणार्‍या मुलाला वाचविण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांने धाव घेतली अन् अनर्थ झाला | पुढारी

पाण्यात बुडणार्‍या मुलाला वाचविण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांने धाव घेतली अन् अनर्थ झाला

पालघर : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथील एका खासगी क्लासच्या सहलीत आलेल्या तिघा विद्यार्थ्यांचा व अन्य एका स्थानिकाचा केळवा येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. एका स्थानिक मुलाला वाचविताना गुरुवारी दुपारी अडीच वाजता ही दुर्घटना घडली. सर्वांत सुरक्षित मानल्या जाणार्‍या या किनार्‍यावर दुर्घटना घडल्याने पर्यटन क्षेत्राला धक्का बसला आहे.

नाशिक येथील एका क्लासचे 39 विद्यार्थी केळवा समुद्रकिनार्‍यावर पर्यटनासाठी आले होते. ते किनार्‍यावर खेळत होते. तेवढ्यात केळवा देवीचा पाडा येथील अथर्व मुकेश नाकरे (13) हा मुलगा पोहत असताना, भरतीच्या लाटांमध्ये अडकला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी नाशिक येथून सहलीसाठी आलेले चार विद्यार्थी कृष्णा शेलार, दीपक वडाकाते, ओम विसपुते, अखिलेश देवरे (सर्व 17 वर्षे) यांनी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र, त्यांनाही लाटांचा अंदाज आला नाही. स्थानिक अथर्वसह कृष्णा, दीपक आणि ओम असे चौघे समुद्रात बुडाले. तर सुदैवाने अखिलेश देवरे हा विद्यार्थी वाचला. चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेमुळे सहलीसाठी आलेल्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

मृतांपैकी अथर्व हा केळवा येथील आदर्श विद्यामंदिरात आठवीत शिकत होता. तर नाशिकचे तिघे विद्यार्थी कृष्णा शेलार, दीपक वडकाते व ओम विसपुते हे नाशिकच्या एका खासगी शिक्षणसंस्थेत इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकत होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माहीमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. त्यानंतर ते मृतदेह मृतांच्या नातेवाइकांकडे सोपवण्यात येतील, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंडारे यांनी सांगितले.

दरम्यान, पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, पोलीस व महसूल यंत्रणेचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर केळवे किनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष गार्ड नेमण्याची मागणी पुढे येत आहे.

.अन् त्यांना मृत्यूने कवटाळले
बुडणार्‍या मुलाला वाचविण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांनी धाव घेतली. भरती संपून ओहोटी सुरू झाल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे हे तरुण समुद्रात खेचले गेले. दिलीप तांडेल या जीवरक्षकासह सूरज तांडेल, भूषण तांडेल, शाहीद शेख, प्रथमेश तांडेल या टांगा व्यावसायिकांनी बुडणार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पट्टीच्या पोहणार्‍या अखिलेश देवरे याला वाचवण्यात
यश आले.

हेही वाचा :

Back to top button