सांगली : पूर्वी टीका करणार्‍यांना आता टेंभूचा कळवळा | पुढारी

सांगली : पूर्वी टीका करणार्‍यांना आता टेंभूचा कळवळा

नेवरी : पुढारी वृत्तसेवा : टेंभू योजना अस्तित्वातच येणार नाही, असे म्हणणार्‍यांना आता या योजनेविषयी एवढा कळवळा का येत आहे, असा सवाल सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केला.

सांगली जिल्ह्यातील नेवरी (ता. कडेगाव) येथे टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनमधून आलेल्या पाण्याचे पूजन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

येथे टेंभूच्या पाण्याच्या वचनपूर्तीसाठी देशमुख यांचा नेवरी ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते यांच्या वतीने नागरी सत्कार झाला. पंचायत समितीच्या सभापती मंगल क्षीरसागर, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी जि.प. उपाध्यक्ष दत्तुशेठ सूर्यवंशी, जि. प. सदस्या रेश्मा साळुंखे, उपसभापती आशिष घार्गे, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, माजी सभापती मंदाताई कारंडे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी टेंभू योजनेच्या कामाचा प्रारंभ केला. त्यावेळी ही योजना वास्तवात नाही. योजनेला मंजुरी नाही. या योजनेचे एस्टिमेट नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. परंतु (स्व.) आमदार संपतराव देशमुख यांनी कोणत्याही परिस्थितीत दुष्काळग्रस्त भागात कृष्णेचे पाणी देणार, असा दृढ विश्वास जनतेला दिला होता. यामुळेच आज टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर आले आहे.

ज्येष्ठ नेते शिवाजीराव महाडिक, माजी सरपंच संतोष महाडिक, बालेखान मुल्ला उपस्थित होते. एच. डी. महाडिक यांनी प्रास्ताविक केले. मयूर महाडिक यांनी आभार मानले.

सांगली :  आमचा नाद करायचा नाही

साखर कारखान्याच्या बाबतीत बोलताना देशमुख म्हणाले, माझ्या सभासदांना जो त्रास झाला आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु सध्या शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचा भास दाखवणार्‍यांना माझे आव्हान आहे, एवढे वर्ष थांबा, पुढच्या वर्षापासून आमचा नाद करायचा नाही.

Back to top button