नाशिक : पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू | पुढारी

नाशिक : पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मुंबई नाका परिसरातील एचसीजी मानवता क्युरी रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात कोसळल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 2) रात्री घडली. अश्पाक शब्बीर नगिनेवाले (25, रा. मदिना चौक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुंबई नाका येथील रुग्णालयात ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या कामासाठी अश्पाक काम करीत होता. बुधवारी रात्री लिफ्टच्या दारावर पोस्टर्स लावण्यासाठी अश्पाक हा पाचव्या मजल्यावर गेला होता. त्यावेळी अश्पाक अचानक लिफ्टच्या मोकळ्या जागेत पाचव्या मजल्यावरून पडला. त्यात त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच अश्पाकचे नातेवाईक, मित्र परिवाराने रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, मुंबई नाका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अश्पाकच्या वारसदाराला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जमावाकडून करण्यात येत होती. यावेळी जोपर्यंत दोषी असणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. अश्पाकच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात ठेकेदार, व्यवस्थापकासह लिफ्टमनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button