बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, ९४ हजार ९४१ विद्यार्थी देणार परीक्षा | पुढारी

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, ९४ हजार ९४१ विद्यार्थी देणार परीक्षा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज म्हणजेच ४ मार्चपासून सुरुवात होत आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यात १६७ मुख्य केंद्र आणि २५२ उपकेंद्र अशा एकूण ४१९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील ९४ हजार ९४१ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी ५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

कोरोनामुळे मागील वर्षी बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा – महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जात आहे. आज, शुक्रवारी बारावीचा पहिला पेपर होणार असून सात एप्रिलपर्यंत बारावीची परीक्षा सुरू राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार आहे.

यंदा ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ या धोरणाप्रमाणे परीक्षा घेतल्या जाणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा १६७ मुख्य केंद्र आणि २५२ उपकेंद्र अशा एकूण ४१९ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात २० परिरक्षक केंद्र असणार आहेत.

परीक्षा केंद्रांवर विलगीकरण कक्ष

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक परिक्षा केंद्रावर एक ते दोन विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. परिक्षेच्या दरम्यान एखाद्या विद्यर्थ्याला ताप आल्यास त्या विद्यार्थ्यावर या कक्षात उपचार देण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी पेपर लिहिण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी पाच भरारी पथके तैनात

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात ५ भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून, जिल्ह्यातील ६ अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पथक, बैठे पथक, प्राथमिक शिक्षणाधिकारी पथक, विशेष महिला पथक आणि उपशिक्षणाधिकारी पथक ही पथके परीक्षा केंद्रांना भेटी देऊन गैरप्रकार रोखणार आहेत.

परीक्षा वेळेत बदल

दरवर्षी बोर्डाकडून पहिला पेपर सकाळी ११ वाजता सुरू होतो. यंदा मात्र, सकाळी १०.३० वाजता पेपर सुरू होणार आहे. ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे दोन पेपर पुढे ढकलले

बारावीचे पेपर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडल्यामुळे ५ आणि ७ मार्चला होणारे दोन पेपर बोर्डाने पुढे ढकलले आहेत. ५ मार्चला हिंदी, जपान, जर्मनी, चिनी आणि पर्शियन भाषेचे पेपर होणार होते. हा पेपर थेट एक महिन्यानंतर ५ एप्रिलला होणार आहे. ७ मार्चला मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उर्दू, फ्रेंच, स्पॅनीश आणि पाली यांचे पेपर होणार होते. हा पेपर थेट एक महिन्यानंतर ७ एप्रिलला होणार आहे.

बारावीची विद्यार्थी संख्या

शाखा           विद्यार्थी संख्या
विज्ञान          ३० हजार १७१
कला            १५ हजार ३४३
वाणिज्य        ४८ हजार ८११
एमसीव्हीसी    ६१६
एकूण           ९४ हजार ९४१

परीक्षा केंद्र

मुख्य केंद्र –  १६७
उपक्रेंद्र – २५२
एकूण – ४१९

बारावी परीक्षा सुरू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा आज इंग्रजी विषयचा पहिला पेपर आहे. कोरोनामुळे परीक्षा केंद्रावर विशेष खबरदारी घेऊन आणि विद्यार्थ्यांचे तपासणी करून त्यांना वर्गात सोडण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. याशिवाय मास्क व सॅनिटायझर व कोवीड १९ आरोग्य विषयक सुचनांचे पालन करुन परीक्षेला सुरूवात करण्यात येत आहे.

यावर्षी ज्या कनिष्ट महाविद्यालयात अथवा शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था परीक्षा मंडळाने केली आहे. प्रश्नपत्रिका संच प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या समोर उघडण्याच्या सुचना परीक्षा मंडळाने दिलेल्या आहेत. विद्यार्थी, पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास व घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे. कोरोनामुळे शाळा तिथे केंद्र असल्यामुळे यावर्षी परीक्षा केंद्राची संख्या वाढली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button