नाशिक : विकास नको पण काम आवरा ; प्रभाग 19 मधील नागरिकांची अवस्था | पुढारी

नाशिक : विकास नको पण काम आवरा ; प्रभाग 19 मधील नागरिकांची अवस्था

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ
जुने नाशिकमधील सध्याचा नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक 19 म्हणजे समस्यांचे आगारच म्हटले पाहिजे. अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि त्यात स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांची भर पडल्याने इथले नागरिकांची अवस्था विकास नको पण काम आवरा अशी झाली आहे. शासनाकडून इथल्या मालमत्ता नुतनीकरणसंदर्भात स्पेशल एफएसआय देण्याचा निर्णय होत नसल्याने क्लस्टर योजनाही लालफितीत अडकून आहे.

महापालिकेच्या नवीन प्रारूप प्रभाग रचनेनुसार जुने नाशिक भागातील प्रभाग क्र. 18 आणि 19 मधील संपूर्ण परिसर हा उद्योग, व्यापारीदृष्ट्या सधन मानला जातो. याच ठिकाणी केवळ नाशिक शहरातूनच नव्हे, तर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून लोक बाजारहटसाठी येत असतात. यामुळे या भागात बाराही महिने गर्दी पहायला मिळते. शहराची प्रमुख बाजारपेठ अशी प्रमुख ओळख असूनही या भागात सोयी सुविधा महापालिका उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. महापालिका स्थापनेला 30 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या कालावधीत महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 21 खेडेगावांचा बर्‍यापैकी विकास साधला जात आहे. परंतु, जुने नाशिक गावठाण भाग मात्र आजही दुर्लक्षित असल्याने येथील नागरिकांना अतिक्रमण, वाहतूक कोंडी नेहमीच सामोरे जावे लागत आहे. त्यातही वाढीव एफएसआय मंजूर केला जात नसल्याने या भागातील जुने वाडे, इमारती अनेक वर्षांपासून नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत.

पार्किंग व्यवस्था नाही, प्रशस्त रस्ते नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. या भागातील दहिपूल, सराफ बाजार यासह भद्रकाली भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कडेला आणि मिळेल त्याठिकाणी विक्रेत्यांचे जाळे निर्माण झाल्याने वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण जणू या भागात लोकांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. त्यात आता गेल्या एक ते दीड वर्षापासून स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांची भर पडल्याने ही विकास कामे नकोशी झाली आहेत. व्यापारी आणि रहिवाशी दोन्ही त्रस्त झाले आहेत.

जुने नाशिकमधील लोकप्रतिनिधी शाहू खैरे, वत्सला खैरे, राजेंद्र बागूल, सचिन भोसले यांच्यासह अनेकांनी नेहमीच संबंधीत प्रश्नी आवाज उठवूनही आजवर हे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. यामुळे आगामी काळात तरी प्रश्न सोडविण्यासाठी मनपा प्रशासन लक्ष घालेल अशी आशा आहे.

असा आहे प्रभाग
प्रभाग क्र. 19 मध्ये एकमुखी दत्तमंदिर, शितळा देवी, सराफ बाजार, बालाजी कोट, गोरेराम मंदिर, जुनी तांबटलेन, म्हसरूळ टेक, संभाजी चौक, डिंगळआळी, बुधवार पेठ, काझीगढी, कुंभारवाडा, हुंडीवालालेन, दरबाररोड, नाईकवाडीपुरा, पठाणपुरा, बडीदर्गा, तिवंधा, मधली होळी या भागाचा प्रामुख्याने समावेश होतो.

प्रमुख इच्छुक उमेदवार
प्रभाग क्र. 19 मध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेमध्येच सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे. त्यात युवा सेनेचे जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, माजी नगरसेवक संजय चव्हाण, उन्नती आहेर, राष्ट्रवादीकडून नगरसेवक गजानन शेलार तर काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे यांची नावे आघाडीवर आहेत. मागील निवडणुकीत झालेले पॅनल यावेळी मात्र दिसून येत नसल्याने स्वतंत्ररित्या निवडणूक लढण्याची तयारी प्रत्येक उमेदवाराकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

जुन्या वाड्यांचा प्रश्न मिटेना
जुने नाशिकमधील जुने वाडे आणि इमारतींचा प्रश्न अजुनही कायम आहे. घरे दुरूस्ती आणि बांधकामास मनपाकडून परवानगी दिली जात नसल्याने जुन्या घरे आणि वाड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. एफएसआय वाढून मिळाल्यास घरांचे बांधकाम तर होईलच शिवाय गावठाण भागातील रस्त्यांचे रूंदीकरण होऊन वाहतूक कोंडीचाही प्रश्न निकाली
निघू शकतो.

नागरिक म्हणतात

रस्ते रूंदीकरण हे अतिक्रमण विळख्यात सापडले आहे. पाण्याची समस्या आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर आहे. स्वच्छता केली जात नाही. जुने नाशिकमध्ये वीज खंडीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. – प्रवीण कुटे, व्यावसायिक

स्मार्ट सिटीमुळे या भागातील अनेक उद्योग धंदे विस्थापीत झाले. घरी पाहुणे यायचे म्हटले तरी गाड्या कुठे लावायचा असा प्रश्न पडतो. या भागात अतिक्रमण लादले गेले आहेत. पार्किंगची नितांत गरज आहे. हा प्रश्न सुटला जात नाही, की सोडविला जात नाही, हाच प्रश्न आहे. – संजय देव, रहिवाशी

जुने नाशिक भागात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने पहिल्या दुसर्‍या मजल्यापर्यंत पाणीच पोचत नाही. त्यामुळे खालून पाणी आणणे जिकरीचे होते. पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा.
– मनीषा बोराडे, गृहिणी

अतिक्रमण ही या भागातील मोठी अडचण आहे. भयमुक्त प्रभाग गरजेचा आहे. अनेक नागरिक दहशतीखालीच वावरत असतात. वाहने लावण्यासाठी जागा नसते. त्यावरून रोज कुठे ना कुठे वादविवाद होताना दिसतात.
– विकी लोणारी, रहिवाशी

हेही वाचा :

Back to top button