मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गेली 30 वर्षे आम्ही सापाच्या पिल्लाला दूध पाजले. आधी ते वळवळ करत होते आता ते फुत्कारतेय, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री भाजपवर हल्लाबोल चढविला. आता हे छापे-बिपे बंद करा, तुमच्यात हिंमत असेल तर माझे सरकार पाडून दाखवा, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांच्या मलबार हिल येथील 'रामटेक' या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत यावेळी महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका करताना या पक्षाला थेट सापाची उपमा दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या देशात एक विकृती आली आहे. एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला पकडून दाखवा, छापे कसले टाकता… तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता; मग दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही? आता हे छापे बंद करा.
आघाडी सरकार हे छापे आता खपवून घेणार नाही. सरकार आज पडेल, उद्या पडेल, असे मागील दोन वर्षे रोज सांगताय. माझे तुम्हाला आव्हान आहे की, माझे 170 मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिले.
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या बळावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमागे राष्ट्रीय तपास यंत्रणा लावणार्या राज्यातील विरोधी पक्ष भाजपला सभागृहात जशास तसे उत्तर द्या, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना दिल्याचे समजते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बुधवारी आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
विरोधकांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याही मागे भाजपने ईडीचा ससेमिरा लावला आहे. गुरुवारपासून सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अराजकीय मुद्दे आणि विविध आरोप करून इतर मंत्र्यांना डागाळण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे आपणही जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी भावनाही पवार यांनी या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती एका मंत्र्याने दिली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.