Ukraine-Russia war : सरकारनं लवकर मायदेशी न्यावं, नाशिकच्या दिशाची आर्त साद | पुढारी

Ukraine-Russia war : सरकारनं लवकर मायदेशी न्यावं, नाशिकच्या दिशाची आर्त साद

देवळा (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा :

गेल्या चार दिवसांपासून रशिया-युक्रेनचे (Ukraine-Russia war) युद्ध सुरु आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहे. केंद्र सरकार युक्रेनमधील भारतीयांना माघारी आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणे येथील दिशा देवरे ही विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकली आहे. तिला लवकरात लवकर मायभूमीत परत आणावे अशी विनंती तिच्या पालकांकडून करण्यात आली आहे. दिशा ही उमराणे येथील डॉ. दीपक शिवाजी देवरे यांची कन्या असून ती दीड वर्षापूर्वी एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेली आहे. (Ukraine-Russia war)

मागील वर्षी जून-जुलै महिन्यात दीड महिना करोनामुळे ती मायदेशी आली होती. दुसऱ्या वर्षाच्या शिक्षणासाठी युक्रेन मधील झेप्रोझिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे ती गेली आहे. मात्र यु्द्द सुरु असल्याने ती युक्रेनमध्ये अडकली आहे. याबाबत तिने व्हिडीओ कॉलद्वारे माहिती दिली आहे.

ती म्हणाली की, येथे 1200 ते 1300 भारतीय विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. युद्धामुळे सर्व युनिव्हर्सिटीत अडकले आहेत. बाहेर जाण्यास परवानगी नाही. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी ही युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे इतर देशाच्या सीमा १ हजार किमीपेक्षा लांब आहेत. त्यामुळे बाहेर निघणे अवघड झाले आहे. आम्हाला येथील प्रशासन धीर देत आहे. खाद्य, सामुग्री साठवून ठेवली असली तरी ती किती पुरेल हे सांगता येणार नाही. भारत सरकारने मदत सुरू केली आहे, आम्हाला लवकरात लवकर मायदेशी परत आणावे, अशी आर्त हाक दिली दिली आहे.  ही गंभीर परिस्थिती सांगताना तिचे डोळे भरून आले होते. (Ukraine-Russia war)

दिशाचे वडील डॉ. देवरे म्हणाले की, आम्ही दिशाच्या सतत संपर्कात आहोत. तिच्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती कळवली आहे. तेथील स्थानिक प्रशासन विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहे. आमचा जीव टांगणीला लागला आहे, तरी भारत सरकारने लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button