मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यातील आगामी महापालिकांच्या निवडणुकीत मनसे ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हे पद रिक्त होते. या पदावर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची निवड करण्याची मागणी पक्षातून होत होती. अखेर मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अमित ठाकरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडे तरूण, विद्यार्थी वर्गाला आकृष्ट करण्यासाठी अमित यांच्या निवडीमुळे फायदा होऊ शकतो.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना केल्यानंतर अध्यक्षपदी आदित्य शिरोडकर यांची निवड केली होती. दरम्यान, शिरोडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर अमित ठाकरे यांची निवड करण्याची जोरदार मागणी पक्षातून आणि कार्यकर्त्यातून होऊ लागली होती. अखेर या पदावर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?