

पंचवटी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : तुरुंगातील साथीदाराला सोडविण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करत विकी ऊर्फ काळ्या कोयत्या नावाच्या गुंडाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एकाच्या मानेला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच 'काळ्या कोयत्या' ने जबरदस्तीने रिक्षामधून अपहरण केल्याची घटना मखमलाबाद बसस्थानक परिसरात घडली.
याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मखमलाबाद गावातील बस स्थानक परिसरात शुक्रवारी (दि.२३) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
विकी उर्फ काळया कोयत्या व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादीच्या पतीला 'आमच्या जेलमधील साथीदाराला सोडविण्यासाठी तुला वारंवार पैसे मागून देखील तू आम्हाला पैसे का देत नाही? असे धमकावत 'थांब आता तुझा गेमच करून टाकतो', अशी धमकी दिली.
तसेच संशयित विकी उर्फ काळया कोयत्या याने फिर्यादी यांच्या पतीच्या मानेला कोयता लावून रिक्षा (एम एच १५ ई एच ३३०५) मध्ये जबरदस्तीने बसवुन घेवुन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयितांवर खुनासाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण केलेल्यामधील संशयित फरार असल्याचे सांगण्यात आले.
हे ही पाहा