नाशिक क्राईम : पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची पोलीस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

नाशिक क्राईम : पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची पोलीस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्या

सटाणा; पुढारी वृत्तसेवा : आधी पत्नीने आत्महत्या केली. नंतर पतीने भीतीने पोलीस स्थानकात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेला युवक नामपूर येथील आहे. तर त्याने जायखेडा पोलीस स्थानकातच गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.९) सायंकाळी उशिरा उघडकीस आली.

शनिवारी (दि.१०) संबंधितावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार आहे. या घटनेमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

नामपूर येथील राजनंदिनी प्रकाश निकम या महिलेने शुक्रवारी (दि.९) सकाळी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी विवाहितेचा पती प्रकाश भीमराव निकम याने पत्नीच्या नातेवाईकांकडून मारहाण होईल या भीतीने स्वतःला पोलिसांच्या हवाली करून दिले. तसेच त्याने सुरक्षेची मागणी केली.

त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी त्यास जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये आणले होते. त्यावेळी त्याने पोलिसांची नजर चुकवली. आणि कापडाच्या साहाय्याने पोलीस ठाण्यातील एका खोलीत खुर्चीवर टेबल ठेवून पंख्याला गळफास लावून घेतला.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला. शनिवारी (दि.१०) जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

नामपूर येथे तणावपूर्ण परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पत्नीच्या आत्महत्येच्या धक्क्याने भीतीतून या युवकाने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे आहे.

त्यास दोन मुले आहेत. या दुर्दैवी घटनेत पती आणि पत्नीने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पाहा व्हिडिओ : पूर्व वैमन्‍यासातून चौघांकडून एकाचा खून

Back to top button