नाशिक : डिलीट केलेली व्हॉट्सअ‍ॅप चॅट मिळाली, डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात नवा ट्विस्ट | पुढारी

नाशिक : डिलीट केलेली व्हॉट्सअ‍ॅप चॅट मिळाली, डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक कलहातून संदीप वाजे याने पत्नी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. संशयित वाजे याने पत्नीसोबत झालेले व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषण डिलिट केले होते. मात्र, पोलिसांनी ते पुन्हा मिळविले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या यशवंत म्हस्के यास न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. म्हस्के याच्या सांगण्यावरून फारकत घेण्यासाठी वाजेने पत्नीला त्रास दिल्याचे, आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

संदीप वाजेने स्वत:सह डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मोबाइलमध्ये असलेले संभाषण डिलिट केले होते. मात्र, पोलिसांनी ते हस्तगत केले आहे. त्यात डॉ. वाजे यांनी त्यांच्या मुलांची काळजी व्यक्त करीत माझ्या आयुष्याचे नुकसान झाले. मात्र मुलांचे नको यासह इतर मेसेजेस संदीप वाजेला केले होते. त्याचप्रमाणे डॉ. वाजे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ’पप्पा शब्दाचा अर्थ माहिती नाही, मुलांची फी कधी भरली नाही, आयुष्यातील जबाबदार्‍या माहिती नसणार्‍या, अर्वाच्च भाषेत बोलणारा, जनावरांसारखा वागणारा, मला त्रास देणार्‍या अशा पतीस…’ अशा मजकुराने सुरुवात केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दोघांमधील तणाव वाढल्याचे स्पष्ट झाले होते. डॉ. वाजे यांनी त्यांच्या जिवास धोका असल्याची भीतीही क्लिनिकमधील सहकार्‍यांकडे व्यक्त केली होती.

दरम्यान, संदीप वाजेची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाल्यानंतर वाडिवर्‍हे पोलिसांनी या प्रकरणात दुसरा संशयित बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के यास अटक केली. त्याला गुरुवारी (दि. 17) न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या तपासात डॉ. वाजे यांचा खून झाला. त्या दिवशी संशयित संदीप वाजे व म्हस्के यांच्यात 14 वेळा मोबाइलवरून संभाषण झाल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के याच्याविरोधातही पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला दोन दिवस पोलिस कोठडी व सात दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यामुळे त्याने संदीप वाजेला पत्नीस आत्महत्येला प्रवृत्त करण्याची वा डॉ. वाजेंनी आत्महत्या केली, असा बनाव रचण्यास मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

मालमत्तेत हिस्सा नको म्हणून घातपात?
पोलिस तपासात समृद्धी महामार्गाच्या कामात संदीप वाजेकडील शेतजमीन गेल्याने त्याला शासनाकडून सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा मोबादला मिळणार असल्याचे समजले. यातील सुमारे अडीच कोटी रुपये डॉ. वाजे यांना द्यावे लागतील, अशी शक्यता असल्याने डॉ. वाजे यांचा घातपात केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button