सांगलीत मार्चमध्ये ‘अ‍ॅग्री पंढरी’ प्रदर्शन | पुढारी

सांगलीत मार्चमध्ये ‘अ‍ॅग्री पंढरी’ प्रदर्शन

सांगली : पुढारी वृत्तसेवा : दैनिक ‘पुढारी’ माध्यम समूह आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘अ‍ॅग्री पंढरी’ हे कृषी प्रदर्शन होणार आहे. विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस कृषी विभागाच्या फळबाग – रोपवाटिका जागेवर हे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या पीक प्रात्यक्षिकांसाठी सहभागी होणार असल्याने प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरणार आहे. ‘ऑर्बिट क्रॉप सायन्सेस’ हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

फेब्रुवारी 2020 मध्ये दै. ‘पुढारी’तर्फे या पद्धतीचे प्रदर्शन येथे आयोजित केले होते. पश्चिम महाराष्ट्रातील या प्रदर्शनास त्यावेळी जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या वर्षीच्या प्रदर्शनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रात्यक्षिकांसाठी पिकांच्या लागवडीचा प्रारंभ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार, फळ-रोपवाटिका विभागाचे कृषी अधिकारी अनिल फोंडे, ऑर्बिट क्रॉप सायन्सेसचे संचालक दीपक राजमाने व बजाज अ‍ॅग्रो अँड अ‍ॅटोचे संचालक शेखर बजाज यांच्या उपस्थितीत झाला. प्रदर्शनामध्ये 50 पेक्षा अधिक पिकांची लागवड यानिमित्ताने करण्यात आली आहे.

प्रदर्शनामध्ये शेतकर्‍यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लागवड केलेली 50 पेक्षा अधिक भारतीय, विदेशी पिके पाहता येतील. कीटकनाशके, खते, बियाणे आणि शेती अवजारे यांचे तीनशेपेक्षा अधिक स्टॉल असतील. अत्याधुनिक आणि आंतरपीक शेती कशी करावी याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मिळणार आहे. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोपांमधील अंतर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, शेततळे, अत्याधुनिक अवजारे, ट्रॅक्टर, ब्लोअर, पेरणी यंत्र, रोप लावणी यंत्र आदी विविध प्रकारची माहिती एकाच ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.

Back to top button