Nashik murder : पिता-पुत्राला ज्या वाहनात मारले, त्याचा क्रमांक निघाला बनावट | पुढारी

Nashik murder : पिता-पुत्राला ज्या वाहनात मारले, त्याचा क्रमांक निघाला बनावट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांच्या खून प्रकरणात (Nashik murder) अटकेत असलेला संशयित राहुल गौतम जगताप (36, रा. जुनी पंडित कॉलनी) याच्या पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पिता-पुत्राला ज्या वाहनात बसवून जिल्ह्याच्या वेशीबाहेर नेत खून केले ते वाहन पोलिसांनी शोधले आहे. फॉरेन्सिक पथकाने वाहनातील पुरावे गोळा केले आहे. मात्र, या वाहनावरील नंबरप्लेट बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हे वाहन चोरीचे आहे की, पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी संशयिताने हा कट रचला, याचा तपास पोलिस करत आहेत.

कापडणीस कुटुंबीयांसोबत शेजारचे किंवा नातलग जास्त संपर्कात नसल्याचे लक्षात आल्यानंतर संशयित राहुल जगताप याने डॉ. अमितसोबत ओळख वाढवली. त्याच्यासह नानासाहेब यांचा विश्वास संपादन करून राहुलने त्यांच्या मालमत्तेची सर्व माहिती गोळा केली. संशयित राहुलने कापडणीस यांची मालमत्ता हडप करण्यासाठी कट रचून 13 ते 16 डिसेंबर 2021 दरम्यान नानासाहेब यांचा खून करून त्यांचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकला. तर त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी डॉ. अमित यांनाही कारमध्ये बसवून अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेऊन खून करीत मृतदेहाची विल्हेवाट करण्याचा प्रयत्न केला. राहुलचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी त्यास अटक करून चौकशी सुरू केली आहे. राहुलने ज्या स्विफ्ट कारमध्ये दोघा पितापुत्रांना नेत जीवे मारले ती एमएच 15, ईबी 6505 क्रमाकांची कार उंटवाडी सिग्नल ते आरडी सर्कलदरम्यान असलेल्या गोफिश हॉटेलबाहेर आढळून आली. फॉरेन्सिक पथकाने कारमधून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. (Nashik murder)

दरम्यान, कार क्रमांकाची तपासणी केली असता, त्या क्रमांकावर दुसरेच वाहन नोंदणी असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे गुन्ह्यात वापरलेल्या कारची माहिती मागवली आहे. राहुलकडे ही कार गेल्या अडीत ते तीन वर्षांपासून असल्याने ही कार चोरीची आहे की, इतर कोणत्या कारणामुळे बनावट वाहन क्रमांक लावण्यात आला, याचा शोधही पोलिस घेत आहेत. अनेक दिवसांपासून ही कार गोविंदनगर मार्गावर धूळ खात पडलेली होती. दरम्यान, पोलिसांनी संशयित राहुल जगताप याच्या घराचीही झडती घेतली आहे. संशयित राहुल जगतापने शेअर्स विक्री करून आलेल्या पैशातून रेंज रोव्हर कार विकत घेतली होती, ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे. (Nashik murder)

महत्त्वाचे धागेदोरे हाती : पोलिसांनी कारची पाहणी केली असता, कारच्या बाहेरील व आतील बाजूस रक्ताचे काही डाग सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. हे रक्त कापडणीस पिता-पुत्र यांचे असल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे कारमध्ये दगड आढळून आल्याचे समजते. त्यामुळे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांचा सलग 50 तासांहून अधिक काळ तपास
पोलिसांच्या प्राथमिक तपासात राहुलवर संशय आल्यानंतर पोलिसांनी सलग तीन दिवस त्याच्याकडे चौकशी करीत व तांत्रिक पुरावे गोळा करून राहुलविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. सलग 50 तासांहून अधिक तपास पोलिसांनी केल्याचे बोलले जात आहे. या कार्याची दखल घेत पोलिस उपआयुक्त अमोल तांबे यांनी पथकास 10 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे, सहायक निरीक्षक यतिन पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलिस नाईक नितीन थेटे संतोष लोंढे, शिपाई विशाल पवार, युवराज भोये, विष्णू खाडे, अजय ससाणे, योगेश वायकंडे, रवींद्र लिलके, विलास देशपांडे आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button