नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 11 मध्ये उमेदवारांना आरक्षणाची धास्ती | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 11 मध्ये उमेदवारांना आरक्षणाची धास्ती

नाशिक : सतीश डोंगरे : नव्या प्रभाग रचननेनुसार पूर्वीच्या प्रभाग 8 मधील बहुतांश भाग आताच्या प्रभाग 11 मध्ये शाबूत असल्याने, शिवसेनेचे चारही विद्यमान नगरसेवक नव्या प्रभागातूनच लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, तिघांनाच प्रभागातून निवडणूक लढविता येणार असल्याने, आरक्षण सोडतीकडे आता लक्ष लागून आहे. प्रभागात एक एससी, एक एसटी व एक महिला राखीव असे आरक्षण पडल्यास विद्यमान नगरसेवकांना अन्यत्र शोधाशोध करावी लागेल. त्यातच दोन आरक्षणे निश्चित असल्याने प्रस्थापितांना हादरा बसण्याची शक्यता आहे. अशात विद्यमानांसह इच्छुकांचा शेजारच्याही प्रभागावर डोळा असून, उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी पक्षांतर वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप, मनसे, राष्ट्रवादी व इतर उमेदवारांना धूळ चारत शिवसेनेच्या विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, राधाबाई बेंडकुळे यांनी विजयश्री खेचून आणली होती. प्रभागरचनेत फारसा बदल झाला नसल्याने, विद्यमान नगरसेवक याच प्रभागात उमेदवारीस इच्छुक आहेत. मात्र, आरक्षण सोडतीवर सर्व काही अवलंबून असल्याने, सर्वच ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. सर्वच पक्षांसाठी अनुकूल राहिलेल्या या प्रभागात यावेळी भाजप आ. सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कन्या रश्मीसह भाजपचे पॅनल निवडून आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे गटनेता असलेले विलास शिंदे हेदेखील गेल्या पंचवार्षिकप्रमाणे संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचा करिष्मा करणार काय? हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

असा आहे प्रभाग 11
गंगापूर व नवश्या गणपती, आनंदवली परिसर, संत कबीरनगर, सिरीन मेडोज, बळवंतनगर, सोमेश्वर परिसर, काळेनगर.

प्रमुख इच्छुक उमेदवार
विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, रश्मी हिरे, अ‍ॅड. महेंद्र शिंदे, दत्ता पाटील, कविता गायकवाड, उषा बेंडकोळी, नानासाहेब कदम, गौतम जाधव, राहुल जाधव, शंकर पोटिंदे, सागर कोथमिरे, राजू जाधव, डॉ. अमोल वाजे, प्रवीण पाटील, नारायण जाधव, अमित कोथमिरे, प्रवीण अहिरे, आशा भंदुरे, अर्चना कोथमिरे, रूपाली अहिरे आदी.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रभागाची ओळख आहे. गेल्यावेळी प्रभागात शिवसेनेचे पॅनल निवडून दिले होते. प्रभागातील बहुतांश कामे मार्गी लागले. मात्र, आणखी कामे प्रभागात व्हायला हवीत. – संतोष आंबेकर

प्रभागातील सर्व नगरसेवकांची कामे समाधानकारक आहेत. पुढील काळात आणखी कामे करण्यास वाव आहे. नाशिक शहरातील आदर्श प्रभाग म्हणून आपल्या प्रभागाचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. – स्वप्नील पाटील

85 टक्के प्रभाग शाबूत
नव्या प्रभागरचनेनुसार आनंदवली गावठाण दोन प्रभागांत विभागले गेले आहे. शिवनगर, शंकरनगर, बजरंगनगर हा जवळपास पाच हजार हजार मतदार असलेला भाग अन्य प्रभागाला जोडला गेला आहे. त्याव्यतिरिक्त पूर्वीच्या प्रभाग 8 चा 85 टक्के भाग शाबूत आहे. गंगापूरगाव, सोमेश्वर मंदिर परिसर, आनंदवली, शंकरनगर, सावरकरनगर हा परिसर प्रभागात शाबूत आहे.

सर्वच पक्षांना संधी
पूर्वीचा प्रभाग 8 व आताचा 11 झालेल्या या प्रभागात कधीही कोण्या एका पक्षाने प्राबल्य राहिले नाही. कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागात नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर भाजप व शिवसेनेचाही बालेकिल्ला म्हणून हा प्रभाग कधीकाळी नावारूपास आला आहे. मनसेलाही या प्रभागात सामावून घेतले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना न्याय देणार्‍या या प्रभागात यंदा कोणाची सरशी होणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button